सांगली : 8 वी पर्यंतच्या शाळेत आता ‘आनंददायी शिक्षणा’चे धडे | पुढारी

सांगली : 8 वी पर्यंतच्या शाळेत आता ‘आनंददायी शिक्षणा’चे धडे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीची जागरूकता निर्माण व्हावी, चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खासगी अनुदानित संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये 2022-23 पासून इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय परिपाठात आनंददायी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे, तसा आदेश शासनाने काढला आहे.

अलीकडच्या काळामध्ये गुणवत्तापूर्ण शाळेला महत्त्व आले आहे. जागतिकस्तरावरही शिक्षणामध्ये अमूलाग्र बदल करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर शालेयस्तरावर आनंददायी कृतींचा समावेश करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातून या उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

उपक्रमाचे उद्देश

विद्यार्थ्याचे मानसिक स्वास्थ उत्तम राखणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे, शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम बनविणे, संभाषण कौशल्य विकसित करणे, स्वतःची जाणीव विकसित करणे, शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे, समस्या निराकरण करण्यास सक्षम बनविणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

प्रत्येक मंगळवारी शिक्षकांनी स्वतः मूल्ये, गाभा घटक, जीवन कौशल्य, जबाबदारीचे भान यांची जाणीव करून देणारी नावीन्यपूर्ण गोष्ट सांगून प्रश्‍न विचारणार. बुधवारी त्याच गोष्टींची पुनरावृत्ती विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी आणि शुक्रवारी कृती किंवा शिक्षकांनी लिहावी आणि सदर कृती विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात येणार आहे. शनिवारी शालेय परिपाठामध्ये अभिव्यक्तीसाठी उपक्रम घेण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक दिवशी साप्ताहिक नियोजनानुसार शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासाला आनंददायी कृती हा 35 मिनिटांचा असतील. प्रति तासिकेमधून 5 मिनिटांचा कालावधी कमी करून आनंददायी तासिकेसाठी हा वेळ काढण्यात येणार आहे.

ना मूल्यमापन, ना परीक्षा; आनंदी कृतीचे होणार मोजमाप

या उपक्रमाचे कोणतेही औपचारिक लेखी मूल्यमापन होणार नाही. त्यासाठी कोणतेही परीक्षा घेतली जाणार नाही. विद्यार्थी किती आनंदी राहतो, किती आनंदाने, उत्साहाने अभ्यास करतो, आनंददायी कृतीमध्ये कसा सहभागी होतो यावरून अनौपचारिकरित्या त्याचे मूल्यांकन केले जाणार आहे.

जिल्ह्याचा आदर्श राज्यात; सीइओ जितेंद्र डुडी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड म्हणाले, जिल्ह्यात मॉडेल स्कूल उपक्रमाची चळवळ सुरू आहे. या संकल्पनेतून यापूर्वीच ‘आनंददायी शिक्षण’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा आदर्श घेऊन राज्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही अभिमानाचीच बाब आहे.

Back to top button