सांगली : पंजाबात 1.20 कोटींचे सोने चोरी; एकाला अटक | पुढारी

सांगली : पंजाबात 1.20 कोटींचे सोने चोरी; एकाला अटक

कवठेमहांकाळ; पुढारी वृत्तसेवा : जंडियाला (अमृतसर, पंजाब) येथे झालेल्या 1 कोटी 20 लाखांच्या सोने चोरीप्रकरणी नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील एकाला अटक करून त्याच्याकडून 40 लाख रुपये किमतीची 815 ग्रॅम सोन्याची लगड पोलिसांनी जप्‍त केली. विठ्ठल दादू कदम (वय 45) असे संशयिताचे नाव आहे. त्याचा मुलगा अनिकेत कदम (वय 20) हा या प्रकरणातील मुख्य संशयित असून तो फरार झाला आहे.

याबाबत माहिती अशी, जानेवारी 2022 मध्ये जंडियाला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सराफी दुकानातून दोन किलो तीनशे ग्रॅमहून अधिक सोने चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या सोन्याची किंमत एक कोटी 20 लाख रुपये होते. चोरी झालेल्या दुकानात संशयित विठ्ठल कदम याचा मुलगा अनिकेत कदम हा कामाला होता. त्यानेच चोरी केल्याचा पंजाब पोलिसांना संशय होता. अनिकेतचा शोध घेत जंडियाला पोलिस ठाण्यातील एसआय दविंदरसिंह हे पथकासह कवठेमहांकाळला आले होते. याबाबत त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर गोडे यांना माहिती दिली. त्यानंतर जंडियाला व कवठेमहांकाळ पोलिसांनी संयुक्‍तपणे नरसिंहगाव येथे छापा टाका. यावेळी विठ्ठल कदम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे 40 लाखांचे सोने आढळले. उर्वरीत सोन्याचे आरोपीने काय केले, त्याचा थांगपत्ता अजूनही लागलेला नाही. या प्रकरणातील मुख्य संशयित अनिकेत कदम हा फरार झाला आहे. पंजाब आणि कवठेमहांकाळ पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

जंडियाला पोलिस ठाण्याचे एसआय सिंह आणि कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक गोडे, शिवाजी करे, पोलिस नाईक, अमिरशा फकिर, पोलिस नाईक कराळे, कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, पोलिस शिपाई दीपक पवार यांनी ही कारवाई केली.

Back to top button