सांगली : नऊ आत्महत्या नव्हे; हत्याकांड | पुढारी

सांगली : नऊ आत्महत्या नव्हे; हत्याकांड

सांगली; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबातील नऊजणांनी आत्महत्या केली नसून, त्यांची एका मांत्रिकासह दोघांनी हत्या केल्याची धक्कादायक माहिती सोमवारी पोलिस तपासातून उजेडात आली. गुप्तधनाचे आमिष दाखवून मांत्रिकाने हे हत्याकांड केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सोलापुरातील एका मांत्रिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आब्बास महंमदअली बागवान (वय 48, रा. मुस्लिम बाशा पेठ, मुलेगाव रोड, सरवदेनगर, सोलापूर) व धीरज चंद्रकांत सुरवशे (30, वसंत विहार ध्यानेश्‍वरीनगर प्लॉट नंबर 59, जुना पूना नाका, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील बागवान हा मांत्रिक आहे. सोमवारी पहाटे सोलापुरातील घरावर छापे टाकून पोलिसांकडून दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना मंगळवारी (दि.28) दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संशयित आरोपींकडून एक कार जप्त करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात 20 जून रोजी म्हैसाळ येथे डॉ. माणिक वनमोरे व त्यांचे भाऊ पोपट वनमोरे यांच्यासह कुटुंबातील नऊजणांचे मृतदेह आढळून आले होते. माणिक यांच्या घरात सहा, तर पोपट यांच्या घरात तीन मृतदेह सापडले होते. त्यांनी लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या सापडल्या होत्या. यामध्ये त्यांनी सावकारांसह काही जणांकडून कर्ज घेतल्याचा उल्लेख होता. यावरून वनमोरे कुटुंबाने सामुदायिक विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज होता.

जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी या प्रकरणात आणखी काय कारण आहे का, याचा शोध घेतला जाईल, असे सांगितले होते. मृत माणिक यांच्या सासर्‍याने पोलिसांना एक मांत्रिक नेहमी घरी येत होता, अशी माहिती दिली. यावरून पोलिसांनी मृत कुटुंबातील
सर्वांचे मोबाईल ‘कॉल डिटेल्स’ काढले. यातून मांत्रिकाचे नाव निष्पन्न झाले.

पोलिस आपल्या मागावर असल्याची कुणकूण लागताच मांत्रिक पसार झाला होता. रविवारी रात्री तोे घरी आल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांचे पथक तातडीने रवाना झाले. तेथील पोलिसांची मदत घेऊन दोघांना पकडले. बागवान हा मांत्रिक आहे. तर धीरज सुरवशे हा टेम्पो चालक आहे. गेल्या काही दिवसापासून तो बागवानकडे काम करीत होता.
दोनशे कोटींचे

गुप्तधन असल्याचे आमिष

वनमोरे कुटूंब काही महिन्यापूर्वी बागवानच्या संपर्कात आले होते. बागवानने ‘तुमच्या घरातील गुप्तधन शोधून देतो. दीडशे ते दोनशे कोटीचे धन घरात आहे’, असे आमिष दाखविले होते. या बदल्यात त्याने काही रक्कम मागितली. ही रक्कम वनमोरे यांनी सावकार तसेच गावातील काही लोकांकडून हातऊसने घेऊन बागवानला दिली होती.

पैसे घेतल्यानंतर अनेकदा बागवान वनमोरे यांच्या घरी येऊन गेला होता. मात्र प्रत्यक्षात त्याने गुप्तधन शोधून दाखविलेच नाही. त्यामुळे वनमोरे कुटुंबाने त्याला दिलेले पैसे परत करण्याची मागणी केली. पण तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. वनमोरे यांनी ‘पैसे दे नाही तर पोलिसांत तक्रार करतो, असे सांगितले. त्यामुळे हा मांत्रिक वनमोरे यांच्यावर चिडून होता.

अनेक बाबींचा खुलासा बाकी

पोलिसांत तक्रार झाली तर आपला भांडाफोड होईल, अशी त्याला भिती होती. यातून त्याने साथीदाराच्या मदतीने वनमोरे कुटुंबास मारण्याचा कट रचला. त्यानुसार त्याने जेवणातून किंवा पाणी पुरीमधून विषारी द्रव्य देऊन कुटूंबातील नऊ जणांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित मांत्रिक आणि त्याच्या साथीदाराने वनमोरे कुटुंबियांना नेमक्या कशा पध्दतीने विष दिले, त्या दिवशी हे दोघे नेमके कधी वनमोरे कुटुंबियांच्या घरी गेले, या कुटुंबियांना ठार मारण्याचा प्लॅन त्यांनी कधी रचला आणि कसा पार पाडला, या कटात त्यांच्याशिवाय आणखी कुणाचा सहभाग आहे काय, मांत्रकाने नेमकी किती रक्कम हडप केली होती, यासह अनेक बाबी या दोघांच्या चौकशीतून पुढे येणार आहेत. त्या दृष्टीकोनातून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल : गेडाम

गुप्तधन शोधण्यासाठी मांत्रिक अनेकदा वनमोरे यांच्या घरी येऊन गेला होता, असे जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी सांगितले. ते म्हणाले, या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल. वनमोरे कुटुंबाकडून मांत्रिकाने किती रुपये घेतले होते? मारण्याचा कट कधी रचला? विषारी द्रव कशातून दिले? मांत्रिकासोबत आणखी कुणाचा सहभाग आहे का? या सर्व बाबींचा लवकरच तपासातून उलगडा केला जाईल.

‘त्या’ दोन्ही चिठ्ठ्या लिहिल्या कोणी?

नऊजणांच्या मृतदेहांजवळ दोन चिठ्ठ्या सापडल्या. या चिठ्ठ्या लिहिल्या कोणी? हत्याकांड हे रात्रीचे घडले. मांत्रिक त्यांच्या घरी कधी आला होता? त्याने या सर्वांना कशा प्रकारे मारले? वनमोरे यांची मुलगी कोल्हापूर जिल्ह्यात बँकेत नोकरीस होती. तीही त्याचदिवशी कशी काय आली? असे अनेक प्रश्‍न पोलिसांना तपासात निर्माण झाले आहेत.

Back to top button