सांगली : जीएसटी घोटाळाप्रकरणी पडताळणीला गती | पुढारी

सांगली : जीएसटी घोटाळाप्रकरणी पडताळणीला गती

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेकडील जीएसटी घोटाळाप्रकरणी ठप्प झालेल्या पडताळणीला अखेर केंद्रीय जीएसटीच्या सांगली कार्यालयाने गती दिली आहे. दोनशे ठेकेदारांच्या ‘जीएसटी’बाबतच्या माहितीची पडताळणी सुरू आहे. सुमारे चारशे ठेकेदारांचा जीएसटी नंबर अथवा पॅन नंबर मिळावा, यासाठी त्यांची यादी महानगरपालिकेकडे पाठविण्यात आली आहे.

जीएसटी नोंदणी नसलेल्या, नोंदणी रद्द झालेल्या ठेकेदारांनाही महानगरपालिकेने 12 टक्के जीएसटी रकमेसह बिले दिली. हा जीएसटी घोटाळा दैनिक ‘पुढारी’ ने ऑगस्ट 2021 मध्ये चव्हाट्यावर आणला. चार मक्तेदारांची बिले आणि त्यांचा ‘जीएसटी स्टेटस’ तपासला असता जीएसटी घोटाळ्याचे चार नमुने समोर आले. संपूर्ण चौकशी केली तर घोटाळ्याचे मोठे घबाड समोर येण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने जीएसटी कार्यालयाकडून चौकशीसाठी हालचाल झाली. मात्र बराच कालावधी हा माहिती मागविण्यात आणि ती सादर करण्यातच गेला. त्यानंतरही जीएसटी पडताळणी पूर्ण झाली नाही. पडताळणीकडे डोळेझाकपणा केला. घोटाळा समोर आणल्यानंतर त्याची तड ज्या गतीने व गांभीर्याने व्हायला पाहिजे, ती गती आणि गांभीर्य दिसले नाही. त्याकडेही दैनिक ‘पुढारी’ ने लक्ष वेधले.

त्यानंतर आता जीएसटी कार्यालयाने महापालिकेतील जीएसटी घोटाळाप्रकरणी पडताळणीचे काम गांभीर्याने हाती घेतल्याचे दिसत आहे. सुमारे तेराशे ते पंधराशे कामांची यादी महापालिकेने यापूर्वीच जीएसटी कार्यालयाला पाठविलेली आहे. त्यातील 200 ठेकेदारांच्या सुमारे 500 कामांबाबत ठेक्याची रक्कम, जीएसटी नंबर अथवा पॅन नंबर याची माहिती उपलब्ध आहे. त्यावरून पडताळणी सुरू आहे. सुमारे 400 ठेकेदारांच्या कामांची यादी, कामांची रक्कम आदी माहिती महापालिकेकडून मिळालेली आहे, पण त्यांचा जीएसटी नंबर अथवा पॅन नंबर याची माहिती उपलब्ध नाही. पडताळणीसाठी या ठेकेदारांचा जीएसटी नंबर अथवा पॅन नंबर सादर करावा, असे पत्र केंद्रीय जीएसटी कार्यालयाने महापालिकेकडे पाठवले आहे. जीएसटी घोटाळा अजूनही माहिती मागविण्यातच घोटाळला असल्याचे दिसत आहे.

Back to top button