इस्लामपूर : राष्ट्रवादीविरोधात भाजपा की आघाडी! | पुढारी

इस्लामपूर : राष्ट्रवादीविरोधात भाजपा की आघाडी!

इस्लामपूर ; संदीप माने : वाळवा तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट तर पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीविरुद्ध विकास आघाडी अशी लढत झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीने वर्चस्व राखले होते. मात्र, आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशा लढतीचे चित्र आहे.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध विकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडी अशी लढत झाली होती. विरोधकातील फाटाफुटीचा फायदा राष्ट्रवादीला झाला होता. जि. प. च्या 11 पैकी 5 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. महाडिक गटाने 3, हुतात्मा गट 1, काँग्रेस 1, अपक्ष एका जागेवर विजयी झाला होता. वाळवा पंचायत समितीत राष्ट्रवादीचे 12, विकास आघाडीचे 7, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी 2, काँग्रेसचा एक असे सदस्य होेते.

मात्र, आता पाच वर्षांत राजकीय समीकरणे बदलली आहेत. माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिराळा विधानसभा मतदारसंघात असलेल्या तालुक्यातील 48 गावांत राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडले आहेत. सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपने राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांना राज्यपातळीवर पदे देऊन ताकद दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी वेगळा गट निर्माण केला आहे. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसेनेचे आनंदराव पवार, हुतात्मा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वैभव नायकवडी, गौरव नायकवडी यांच्याही भूमिका महत्त्वाच्या ठरतील.

तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक राजकारणात पकड आहे. विकासकामांच्या कार्यक्रमानिमित्ताने काही दिवसांपासून पालकमंत्री जयंत पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामुळे तालुक्यात काँग्रेस, शिवसेनेची काय रणनीती राहणार, याकडे लोकांचे लक्ष आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, मनसे, वंचित बहुजन आघाडी यांची भूमिका देखील चर्चेत राहणार आहे.

आघाडीसाठी पुढाकार कोण घेणार?

इस्लामपूर नगरपालिकेच्या गत निवडणुकीत विकास आघाडीचा फॉर्म्युला जि.प. आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वापरण्यात आला होता. आघाडीसाठी (स्व.) नानासाहेब महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवाजीराव नाईक, हुतात्मा गटाने पुढाकार घेतला होता. आता राष्ट्रवादी विरोधकामध्ये आघाडीसाठी कोण पुढाकार घेणार, असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात होत आहे.

Back to top button