ढाणेवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर | पुढारी

ढाणेवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर

कडेगाव संदीप पाटील : ढाणेवाडी परिसरात (ता. कडेगाव) गावात गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी अधिकार्‍यांकडे पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी करूनही अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. सध्या गावात पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे.

या गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते, याची अधिकार्‍यांना माहिती असूनही अधिकारी तिकडे फिरकलेच नसल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. या गावांसाठी कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने गावातील जनावरांचेही अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे ढाणेवाडी गावात पिण्याच्या पाण्याची तत्काळ सोय करावी अन्यथा कडेगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सामाजिक कार्यकत विकास माने म्हणाले, दरवर्षी उन्हाळ्यात गावातील महिलांना व ग्रामस्थ लहान मुले यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या गावात कितीही पाऊस झाला तरी डोंगर उतारामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते. परंतु उन्हाळा संपत आला तरी ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे चार ते पाच दिवसात पिण्याच्या पाण्याची सोय केली नाहीतर गावातील महिला, ग्रामस्थ यांच्यासमवेत कडेगाव तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे.

ढाणेवाडी माजी ग्रामपंचायत सदस्य हणमंतराव ढाणे म्हणाले, जानेवारी महिना सुरू होताच पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आम्ही ग्रामपंचायत व प्रशासनाकडे पाण्याची सोय करण्याची मागणी केली, पण प्रशासन किंवा ग्रामपंचायतीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय नाही.

अधिकार्‍यांचे दुर्लक्ष; तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

हेही वाचा

Back to top button