सांगलीत बाजारातून दागिने, रोकड लंपास | पुढारी

सांगलीत बाजारातून दागिने, रोकड लंपास

सांगली ः पुढारी वृत्तसेवा येथील चैतन्यनगरमधील ज्योती गणेश गायकवाड यांची आठवडा बाजारातून दागिने व रोकड असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली. यामध्ये 62 हजाराचा ऐवज होता. संजयनगर येथील आठवडा बाजारात ही घटना घडली. ज्योती गायकवाड व त्यांची नणंद आठवडा बाजारात भाजी खरेदीसाठी गेल्या होत्या. दागिने, रोकड, एटीएम कार्ड त्यांनी पर्समध्ये ठेवले होते. थोडे पैसे त्यांनी हातातच घेतले होते. पर्स त्यांनी भाजीच्या पिशवीत ठेवली होती.

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील पर्स हातोहात लंपास केली. घरी गेल्यानंतर पिशवीतून भाजी काढत असताना त्यांना पर्स नसल्याचे लक्षात आले. त्यांनी घरी हा प्रकार सांगितला. घरातील लोक पुन्हा बाजारात गेले. पर्स कुठे पडली आहे का, याचा शोध घेतला. पण पर्स सापडली नाही. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी संजयनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. दागिने चोरीला जाऊ नयेत म्हणून त्यांनी ते पर्समध्ये ठेवले होते. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button