सांगली : पत्र्याच्या शेडवरून पडल्याने कामगार ठार | पुढारी

सांगली : पत्र्याच्या शेडवरून पडल्याने कामगार ठार

समडोळी : पुढारी वृत्तसेवा

सोलर यंत्रणा बसविण्याचे काम सुरू असताना कारखान्याच्या 40 फूट उंच पत्र्याच्या शेडवरून पडल्याने विनोद नरसू चौगुले (वय 25, रा. शिरटी, ता. शिरोळ) हा कामगार ठार झाला. समडोळी-कवठेपिरान रस्त्यावरील संपदा पेपर मिलमध्ये मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
विनोद चौगुले जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील एका सोलर कंपनीत काम करीत होता. मंगळवारी तो संपदा पेपर मिलमध्ये सोलर यंत्रणा बसविण्यासाठी आला होता. काम करण्यासाठी तो 40 फूट उंचीच्या पत्र्याच्या शेडवर गेला होता. एका जीर्ण झालेल्या पत्र्याच्या शेडवर त्याचा पाय पडल्याने तो थेट खाली कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

कामगारांनी त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शवविच्छेदन तपासणी झाल्यानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

Back to top button