सांगली : शिक्षण विभागातच ‘टक्केवारी’चा ‘क्लास’ | पुढारी

सांगली : शिक्षण विभागातच ‘टक्केवारी’चा ‘क्लास’

सांगली : संजय खंबाळे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे ‘ठाणेदार’ शुक्रवारी पदवीधर वेतन श्रेणी मान्यता प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तीन शिक्षकांकडून लाच घेताना रंगेहाथ सापडले. मात्र हे केवळ हिमनगाचे टोक आहे. गेल्या काही महिन्यात या विभागात टेबलाखालून लाखोंच्या भानगडी झाल्या आहेत, शिक्षण विभागात ‘टक्केवारी’चीच शिकवणी जोरात असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास धक्कादायक माहितीचा पर्दाफाश होऊ शकतो.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचार नवीन राहिलेला नाही. आजपर्यंत जिल्ह्यात अनेक प्रकरणांमध्ये शिक्षण विभागातील काहीजण लाच घेताना जेरबंद झाले आहेत. मात्र, टक्केवारीचा बीमोड करण्यात आजअखेर यंत्रणेला यश आले नाही. किंबहुना तसे प्रयत्न झाले नाहीत. परिणामी 50 हजार रुपयांपासून ते 90 हजार रुपयांपर्यंत दर महिना घसघशीत पगार मिळत असताना देखील अनेकांना टक्केवारीची वारंवार भूक लागते. यातूनच शिक्षकांची पिळवणूक होऊ लागली आहे.

प्रामुख्याने मुख्याध्यापक मान्यता, बदली मान्यता, वेतनेतर अनुदान, वैद्यकीय उपचार – औषधांची बिले, पेन्शन प्रस्ताव, वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ वेतनश्रेणी, फरक बिले, शाळेचे लेखापरीक्षण, वेतननिश्चिती, पडताळणी, जुने पगार काढणे, डी. एड. टू बी. एड. मान्यता आदी अनेक प्रकरणासाठी आजी-माजी शिक्षक शिक्षण विभागात हेलपाटे मारत असतात. मात्र, आलेल्या या गुरूजनांना ढिगभर त्रुटी दाखवून मुद्दामहून त्यांचे प्रस्ताव अडवून ठेवले जातात. नियमांनुसार सर्व गोष्टींची पूर्तता करूनही या शिक्षकांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येतो, अशा तक्रारी आहेत. या हताश झालेल्या लोकांना विभागातच घुटमळणारे काही ‘दलाल’ चहाच्या टपरीवर किंवा हॉटेलमध्ये घेऊन जातात. तिथे त्यांचा रखडलेले काम होण्याच्या पद्धतीचे ‘क्लास’ घेण्यात येतो. टक्केवारीची बोलणी अंतिम करून कामाची हमी दिली जाते. 50 हजार रुपयांपासून ते लाखा- लाखापर्यंत टक्केवारी राजरोस सुरू असल्याची चर्चा आहेच!

शिक्षण विभागातील लिपिक आणि मिरजपूर्व भाग, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, विटा आणि वाळवा तालुक्यांतील काही शिक्षक हे या ‘ठाणेदारा’चे ‘दलाल’ म्हणून वावरतात. जिल्हाभर नेटवर्क करून ठाणेदार आपल्या कार्यालयातून टक्केवारीचा ‘व्यवसाय’ करीत असल्याची चर्चा आहे. सुट्टीच्या दिवशी तर कार्यालयात अनेक गैरप्रकार चालू असल्याची चर्चा जुनीच आहे. टक्केवारी न देणार्‍यांच्या मागे प्रसंगी खोट्या चौकशीचा ससेमिरा लावण्यात येतो.

यात ‘दलाल’ म्हणून काम करणार्‍यांचा प्रत्येक कामांमध्ये हिस्सा ठरलेला असतो. काम झाल्यानंतर ते त्यांना आपली टक्केवारी पोहोच करत असल्याचे बोलले जाते. ‘दलालां’च्या तोर्‍यामुळे विभागातील अनेकजण रडकुंडीला आले आहेत. तोंड दाबून बुक्क्याचा मार खाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईनंतर अनेकांनी आनंदाची भावना व्यक्त केली, यातच सारे काही स्पष्ट होते. दरम्यान, शिक्षण विभागातीलच अनेकांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

फ्लॅट, शेती, सोने, आलिशान वाहनांत कोट्यवधींची गुंतवणूक 

शिक्षण विभागात अनेक नियमबाह्य आणि बेकादेशीर कामे करून अनेकांनी चांगलीच माया जमवली आहे. फ्लॅट, शेती, सोने आणि आलिशान वाहनांची खरेदी करून लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. काहीजणांनी नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या नावावर जमीन, प्लॉट खरेदी करून ठेवल्याची चर्चा आहे.

शिक्षक संघटनेतील नेतेमंडळींकडूनही ‘सुपारी’ 

जिल्ह्यात तर आता शिक्षक संघटनांचे पेव फुटले आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याच्या बहाण्याने काहीजणांनी संघटनेच्या नावाखाली आपली ‘दुकानदारी’ सुरू केली आहे. संघटनेचा दबाव टाकून आणि ठाणेदाराला हाताशी धरून आपला हिस्सा ठेवून विविध कामांची ते सुपारी घेत आहेत. यातून हे तथाकथित नेते मालामाल झाल्याचे बोलले जाते.

Back to top button