सांगली : पीक विम्याचा वाटा देण्यास केंद्राचा नकार | पुढारी

सांगली : पीक विम्याचा वाटा देण्यास केंद्राचा नकार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाने त्यांच्याकडून येणारा पीक विम्याचा वाटा देण्यास नकार दिला आहे. त्याचा 1800 कोटी रुपयांचा भार राज्य शासनावर पडलेला आहे. त्याची पूर्तता आम्ही लवकरच करून शेतकर्‍यांना मदत करू, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

डॉ. कदम म्हणाले, काही पिकांना विमा हा ऐच्छिक ठेवण्यात आला होता. परंतु नुकसानीबाबत विचार करून सर्वांना त्याची भरपाई देण्यात येईल. निर्यातक्षम पीक होण्यासाठी जिल्ह्यात लवकरच 5 ते 7 कोटी रुपये खर्चून विषमुक्त पीक तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. तसेच अवकाळीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत मदत देण्याविषयी ‘बीड जिल्हा पॅटर्न’ सुरू आहे. त्या धर्तीवर अन्य जिल्ह्यातही मदत दिली जाईल.

डॉ. कदम म्हणाले, शासनाने महात्मा फुले यांच्या नावाने शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्याचा लाभ खातेदारांना देण्यात येणार आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्था अडचणीत आली असली तरी सध्या सरकार खंबीरपणे पावले उचलत आहेत. सामाजिक न्याय विभाग व अल्पसंख्याकांसाठी जिल्ह्यासाठी साडे सात कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर मराठी भाषेबाबत शासन चांगले निर्णय घेत असून, भाषा भवन बांधण्यात येणार आहे.

डॉ. कदम म्हणाले, बुर्ली – संतगाव यांना जोडणारा पूल बांधण्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, लवकरच याचे काम सुरू होणार असल्याचे ते म्हणाले.

अंकलखोपला पुस्तकाचे गाव, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी

ते म्हणाले, मराठी भाषा विभागातर्फे राज्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अंकलखोपला पाच ते दहा कोटी रुपये खर्चून पुस्तकाचे गाव तयार करण्यात येणार आहे. ही कल्पना चांगली असून, ती लवकरच अंमलात आणली जाईल. तसेच अंकलखोपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असून, त्या ठिकाणी स्मारक आहे. त्या स्मारकाच्या पुढील कामासाठी 4 ते 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.

काँग्रेसमध्ये नाराजी नाही

डॉ. कदम म्हणाले, सध्या महाआघाडीचे सरकार चांगले चालले आहे. काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. उलट अन्य पक्षातील काही नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असून, लवकरच याचा गौप्यस्फोट होईल.

महापुराबाबत जलसंपदामंत्र्यांना विचारा..

राज्यात 99 टक्के पावसाचा अंदाज असून, महापुराचा पुन्हा धोका आहे. त्यामुळे याबाबत राज्यात महापुराबाबत काय उपाययोजना केल्या आहेत, असे विचारले असता ते म्हणाले, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अलमट्टी धरण, जलआयोग, राज्यातील महापूर परिस्थितीबाबत मंत्र्यांशी बैठक घेऊन निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे यावेळी महापुराला रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केले जातील, त्यामुळे महापुराबाबत जयंत पाटील यांनाच विचारा म्हणून त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

Back to top button