उन्हाळा : सांगलीसह जिल्ह्यात सूर्य कोपला | पुढारी

उन्हाळा : सांगलीसह जिल्ह्यात सूर्य कोपला

सांगली  :  पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढतो आहे. बुधवारी 41 अंश सेल्सिअस असणारा पारा गुरुवारीही 41 अंशावर कायम राहिला. सांगलीत दुपारीतर सूर्य अक्षरशः आग ओकत होता. उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. रस्ते, बाजारपेठ, बसस्थानक दुपारी ओस पडले होते.

उकाड्यापासून बचावासाठी नागरिक टोप्या, गॉगल, सन कोट व अन्य वस्तूंचा वापर करीत आहेत. गारव्यासाठी शीतपेयांकडे लोकांचा कल वाढला आहे. कलिंगड व अन्य फळांना मागणी वाढली आहे. एसी, पंखे, कुलर यांचा वापरही वाढला आहे.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्‍चिम-मध्य महाराष्ट्रात काही भागांत पुढील तीन-चार दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातही तापमानाचा पारा 40 ते 41 अंश सेल्सिअस राहील. एप्रिल महिन्याचे सुरुवातीचे काही दिवस दाहकता वाढणार शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्‍त केला आहे. दरम्यान, उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहवे, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून उकाडा जाणवत होता. दुपारच्यावेळी तर सूर्य आग ओकत होता. बहुसंख्य भागात तापमानाने चाळिशी ओलांडली होती. सांगलीत पारा 41 अंशावर आला होता. वाढत्या उष्णतेने उसासह इतर पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. उन्हापासून पीक वाचवण्यासाठी रात्रं – दिवस शेतीला पाणी देत आहेत. जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेचा तडाखा कायम राहिल. दि. 3 ते 9 पर्यंत अनेक भागात ढगात वातावरण राहील. काही भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडले, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्‍त केला आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button