सांगली : आसंगीत मुलाकडून बापाचा खून | पुढारी

सांगली : आसंगीत मुलाकडून बापाचा खून

जत; पुढारी वृत्तसेवा : बाहेरगावी जाण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून आसंगी (ता. जत) येथे प्रवीण देवाप्पा मोडे (वय 26) याने रागाच्या भरात वडील देवाप्पा ( वय 55) यांचा चाकू व लाकडी दांडक्याने हल्ला करून खून केला.

बुधवारी रात्री ही घटना घडली. याबाबत कस्तुरा मोडे यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रवीण मोडे याला जत पोलिसांनी अटक केली आहे.

देवाप्पा मोडे मजुरी करीत होते. त्यांना तीन मुले आहेत. त्यापैकी दोघे बाहेरगावी असतात. प्रवीण गावात असतो. बुधवारी रात्री देवाप्पा आणि प्रवीण यांच्यात वाद झाला. प्रवीण बाहेरगावी जाण्यासाठी पैशांची मागणी करीत होता. त्यावरून वाद वाढत गेला.

रात्री गावातील लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रवीण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पैसे दिले नाहीत या रागाने प्रवीणने रात्री चाकू व दांडक्याने वडिलांवर हल्ला केला.

‘तुला जिवंत ठेवत नाही’, असे म्हणत त्याने त्यांच्या पाठीवर चाकूने वार केले. दांडक्याने डोक्यात जोरदार मारहाण केली. देवाप्पा गंभीर जखमी झाले. त्यांना जत येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.

प्रवीणची गावकर्‍यांना दमदाटी

ग्रामस्थांनी प्रवीणला मारहाणीबाबत जाब विचारला. परंतु प्रवीणने त्यांनाच दमदाटी केली. घटनेनंतर तो घरात दाराला आतून कडी लावून बसला होता. ग्रामस्थांनी घटनेची माहिती उमदी पोलिसांना दिली.

पोलिसांनी प्रवीणला घरातून ताब्यात घेतले. त्याने वडिलांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. गुरुवारी सकाळी पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, उपनिरीक्षक नामदेव दांडगे तपास करीत आहेत.

Back to top button