सांगली ; रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी | पुढारी

सांगली ; रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : सगळ्या चांगल्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. पक्षात नवी पिढी आली पाहिजे, नव्या पिढीने नेतृत्व केले पाहिजे, हा विचार आमच्या पक्षात मुळापासूनच आहे. त्यामुळे काही अडचण नाही, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी रोहित आर. पाटील यांचे नाव न घेता केले.

ना. पाटील येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त रविवारी आले असता पत्रकारांशी बोलत होते. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांना मिळालेल्या यशामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्याला आज जयंत पाटील यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला.

कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. आर.आर. पाटील यांच्या पश्‍चात पहिल्यांदाच रोहित पाटील हे नेतृत्वासाठी मैदानात उतरले. कवठेमहांकाळचे राजकारण आतापर्यंत घोरपडे-सगरे या गटापुरतेच मर्यादित राहिले. विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर तासगावचा भाग जोडल्यापासून येथील राजकारणात आबांचा गट, खासदार संजय पाटील यांचा एक गट तयार झाला.

नगरपंचायत निवडणुकीमध्ये खासदार पाटील व शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी राष्ट्रवादीच्या एका गटाला सोबत घेऊन शेतकरी विकास आघाडीच्या झेंड्याखाली पॅनेल मैदानात उतरवले होते. जागावाटपात आबा गटाची कोंडी करून देईल त्या जागा मान्य करीत आघाडी करण्याची तयारी दर्शवली. मात्र, रोहित पाटील यांनी अवमानकारक तडजोडीला नकार देत राष्ट्रवादीच्या चिन्हावर पॅनेल मैदानात उतरवले. लोकांनीही या नेतृत्वाला साथ देत 10 जागा देत आबा गटावर विश्वास दर्शवला. घोरपडे-सगरे-खासदार गटाला सत्तेपासून दूर ठेवत बदलत्या राजकारणाची दिशाही निश्चित केली.

दरम्यान राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा उद्धव ठाकरेंनी पूर्ण करून दाखवली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व महाराष्ट्र कधीच विसरणार नाही अशा शब्दात मंत्री पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.

गोव्यात राष्ट्रवादी-शिवसेनेला चांगले यश मिळेल : पाटील

गोव्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असती तर अधिक आनंद झाला असता; पण शिवसेना आणि राष्ट्रवादी त्याठिकाणी एकत्रित आहे. त्यांना मोठे यश मिळेल, असा विश्‍वास मंत्री जयंत पाटील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Back to top button