पनवेलमधील बेपत्ता मुली नवी दिल्लीत; नवी मुंबई पोलिसांकडून ताब्यात | पुढारी

पनवेलमधील बेपत्ता मुली नवी दिल्लीत; नवी मुंबई पोलिसांकडून ताब्यात

पनवेल : पुढारी वृत्तसेवा :  आईवडिलांच्या त्रासाला कंटाळून तसेच घरातील वातावरण आवडत नसल्याने तळोजा भागात राहणार्‍या 5 ते 16 वर्षे वयोगटातील पाच मुली घर सोडून गेल्या होत्या. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या मुलींचा शोध घेऊन त्यांना दिल्लीतील गुडगाव येथून ताब्यात घेतले आहे. या पाचही मुलींचे अपहरण झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती.

तळोजा परिसरातून 5 ते 16 वर्षे वयोगटातील पाच मुली एका वेळेस बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या पालकांनी सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, गुन्हे शाखा युनिट-2 उमेश गवळी, युनिट-3चे पोलिस निरीक्षक मुलाणी तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार केली.

या गुन्ह्यातील अपह्रत पाचही मुलींचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेण्यात येत होता. त्या पुराव्यांच्या आधारे पाच पैकी सोळा वर्षीय मुलगी गुडगांव येथे असल्याचे आढळले. तसेच त्या पाचही मुली एकमेकींच्या सोबत असल्याचेही स्पष्ट झाले होते. पोलिसांनी अपह्रत मुलींपैकी चौदा वर्षीय मुलीचा मानलेला भाऊ आरिफ याला संपर्क साधला. त्यानंतर पाचही मुलींना ताब्यात घेतले. पोलिसांनी चारही मुलींना विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांचे अपहरण झाले नसल्याचे तपासामध्ये आढळून आले.

या पाच मुलींपैकी तिघी जणींनी आपण बहिणी, आईवडिलांच्या त्रासाला कंटाळून तसेच इतर दोघी बहिणी त्यांच्या घरातील वातावरण ठीक नसल्याने घर सोडून गेल्याचे सांगितले. या मुलींना पुढील कार्यवाहीसाठी तळोजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Back to top button