राज्यातील 67 हजार 694 मतदार शतायुषी; निवडणूक विभागातर्फे सर्वेक्षण | पुढारी

राज्यातील 67 हजार 694 मतदार शतायुषी; निवडणूक विभागातर्फे सर्वेक्षण

रायगड; पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा क्षेत्रात 22 लाख 83 हजार 364 मतदार आहेत. यामध्ये वयाची शंभरी ओलांडणार्‍या मतदारांची संख्या 1 हजार 356 म्हणजे 0.05 टक्के आहे. या सर्व मतदारांचे सर्वेक्षण रायगड जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आले.

मतदार यादीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रायगड जिल्हा निवडणूक शाखेने तालुका निवडणूक विभाग आणि विधानसभा निहाय मतदार याद्या तपासण्याचे काम हाती घेतले आहे. एक वर्षानंतर राज्यात प्रथम लोकसभा व नंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यातील 80 वर्षांहून अधिक वय असणार्‍या एकूण 79 हजार 980 मतदारांचे निवडणूक कर्मचार्‍यांतर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात असणार्‍या सात विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्ये 22 लाख 83 हजार 364 मतदार आले. यामध्ये 11 लाख 64 हजार 291 पुरुष, 11 लाख 19 हजार 28 महिला आणि 45 तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात 80 वर्षांहून अधिक वय असणार्‍या मतदारांची संख्या 79 हजार 980 इतकी असलीतरी ज्येष्ठ नागरिक असणार्‍या मतदारांची संख्या खूप मोठी आहे. रायगड जिल्ह्यात 60 वर्षांहून अधिक वय असणार्‍या मतदारांची संख्या 3 लाख 34 हजार 117 इतकी आहे. यामध्ये 60 ते 69 वय असणारे 2 लाख 54 हजार 137, 70 ते 79 वय असणारे 1 लाख 40 हजार 477, 80 ते 89 वय असणारे 62 हजार 292, 90 ते 99 वय असणारे 16 हजार 332 आणि वयाची शंभरी ओलांडणारे 1 हजार 356 मतदार आहेत.

शंभरी ओलांडणारे मतदार

रायगड जिल्ह्यात वयाची शंभरी ओलांडणारे 1 हजार 356 मतदार असल्याचे मतदार याद्यांवरून स्पष्ट झाले आहे. यामध्ये पनवेल विधानसभा क्षेत्रात 110 मतदार, कर्जत विधानसभा क्षेत्रात 396 मतदार, उरण विधानसभा क्षेत्रात 121 मतदार, पेण विधानसभा क्षेत्रात 255 मतदार, अलिबाग विधानसभा क्षेत्रात 162 मतदार, श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रात 75 मतदार आणि महाड विधान सभा क्षेत्रातील 237 मतदारांचा समावेश आहे.

Back to top button