तरुणांची पावले वळली खेकडा शेतीकडे; रोजगारासह मिळतेय लाखोंचे उत्पन्न | पुढारी

तरुणांची पावले वळली खेकडा शेतीकडे; रोजगारासह मिळतेय लाखोंचे उत्पन्न

रायगड;  पुढारी वृत्तसेवा :  मत्स्य व्यवसायाचा खर्च जास्त तर मिळणारा भाव कमी, त्यामुळे सततच्या नुकसानीला वैतागून जिल्ह्यातील अनेक तरुणांनी खेकडा शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. खासकरून अलिबाग आणि कर्जत तालुक्यातील तरुणांनी खेकडा शेतीमधून आर्थिक साधन होण्याचा सुकर मार्ग शोधला आहे. अलिबागमध्ये खाऱ्या पाण्यातील खेकडा आणि कर्जतमध्ये गोड्या पाण्यातील खेकड्याचे उत्पादन घेण्यावर भर दिला जात आहे. खेकडा शेतीतून उत्पादित केलेल्या खेकड्यांना देशभरात मोठी मागणी आहे. या शेतीतून तरुणांना रोजगार मिळण्याबरोबरच लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.

मत्स्य दुष्काळामुळे चिंतेत असलेल्या वैभव आणि धनंजय धुमाळ या सुशिक्षित तरुणांनी अन्य व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. किनारपट्टीलगत गाव असल्याने खाडीतील पाणी तलावात घेऊन खेकडा शेती करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला. खेकडा शेतीचा अभ्यास करून त्यांनी प्रकल्प उभा करून तीन प्रकारची शेती सुरू केली. हळू- हळू त्यांचा या व्यवसायात चांगला जम बसला असून उत्पादित खेकड्यांना बाजारात मोठी मागणी आहे. मऊ खेकड्यांना क्रॅब चिली, क्रॅब बर्गरसाठी मोठी मागणी आहे.

स्वजातीय भक्षता हा खेकड्यांचा मोठा अवगुण आहे. मोठा खेकडा लहान खेकड्याला खातो. त्यामुळे खेकडे एकत्रित ठेवले तर त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होते. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. यावर उपाय म्हणून तलावावर तरंगते बॉक्स ठेवून त्यामध्ये मर्यादित खेकडे ठेवण्याची पद्धत वापरली जाते. यातून उत्पादित होणाऱ्या खेकड्यांना परदेशातूनही मागणी आहे. रिसर्क्युलेशन एक्का कल्चर सिस्टिम पद्धतीचा प्रकल्प उभा केला आहे. त्यातील खेकड्यांना चांगला दर मिळतो, पण या प्रकल्पाचा खर्चही अधिक आहे.
कर्जत तालुक्यात दीपक श्रीखंडे या तरुणाने अनोख्या शेतीची कास धरत खेकडा शेती करण्याला प्राधान्य दिले आहे. बाजारात खेकड्यांची मागणी अधिक असल्याने तरुणांनी खेकडा शेतीकडे लक्ष केंद्रित केले. यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. पाण्याचा हौद बांधून माध्यम आकाराचे गोड्यापाण्यातील खेकडे विकत घेऊन ते हौदामध्ये सोडले. खेकड्यांना खाणे म्हणून भात, नदीतील छोटे मासे दिले जाते. किमान ३००० खेकडे होतील, असा त्यांना विश्वास आहे. गावठी खेकड्यांना भाव अधिक असल्याने ५०० रुपये किलोने खेकड्यांची विक्री होते.

अशी होते खेकडा शेती

तलावामध्ये छोटे खेकडे सोडून पालन केले जाते. थोडे मोठे झाल्यावर तरंगत्या बॉक्समध्ये खेकडे ठेवले जातात. बंदिस्त खेकडा पालन बॉक्समध्ये, घराच्या मागे रास पद्धतीने रिसर्क्युलेशन अॅक्वा कल्चर सिस्टीमनुसार केली आहे. प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून खेकड्यांकडे पाहिले जाते. सांधेदुखी, रक्तदाब, हृदयविकार अशा रुग्णांना डॉक्टर खेकडे खाण्याचा सल्ला देतात. या वैशिष्ट्यांमुळे खेकड्यांना देश-विदेशातून मोठी मागणी आहे. कष्ट करण्याची तयारी असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी खेकडा शेती हा व्यवसाय चांगला पर्याय ठरू शकतो.

Back to top button