स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणा-या बावले ग्रामस्थांच्या नशिबी वनवासच - पुढारी

स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणा-या बावले ग्रामस्थांच्या नशिबी वनवासच

महाड : श्रीकृष्ण द बाळ

स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद देशभर साजरा होत असतानाच हिंदवी स्वराज्याची राजधानी
असणार्‍या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्‍या बावले ग्रामस्थांच्या नशिबी मात्र अजूनही वनवासच असल्‍याचे चित्र दिसून येत आहे. गावाला जोडणारा पूल मागील पावसाळ्यात पडल्यानंतर दोन महिन्यांत त्याची दुरूस्ती न केल्या कारणाने बावले गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असणार्या निजामपूर पर्यंत रुग्णांना डोलीतून न्यावे लागत असल्याने ग्रामस्थ तीव्र संताप व्‍यक्‍त करत आहेत. स्थानिक आमदार व खासदारांनी येत्या काही दिवसांत रस्त्यांची व पुलाची दुरुस्ती न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला जाऊ शकतो, असा इशारा ग्रामस्‍थांनी दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी बावले ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी आजारी पडल्‍या. त्यांना गावातून उपचारासाठी निजामपूर येथे न्यावे लागणार होते. मात्र या मार्गावर रस्ता नसल्याने ज्‍येष्‍ठ ग्रामस्थ व काही तरुणांनी त्यांना डोलीमधून पाच किलोमीटर चालत नेले.  या संदर्भातील गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा व्हायरल होत असून, दोन दिवसांपूर्वीच्या झालेल्या या घटनेचे तीव्र पडसाद किल्ले रायगड परिसरातील ग्रामस्थांमध्ये पहावयास मिळत आहेत.

जुलैमध्ये आलेल्या महापुराने या गावाला जोडणार्‍या दोन्ही बाजूचे पूल हे नादुरुस्त झाले. त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी दोन महिन्यांनंतरही पूर्ण होऊ शकली नाही, हे वास्तवता या संदर्भातील चित्रफितीवरुन दिसून येते. शासनाकडे मागणी करूनदेखील पुलांची दुरुस्ती न झाल्याने अखेरीस गावातील ग्रामस्थांनीच या पुलाची दुरुस्ती केल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिवर्षी निवडणुकीमध्येही रस्ता व पूल बांधून देऊ अशी आश्वासने दिली गेली, मात्र ते केवळ आश्‍वासनच राहिले, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक श्री महादेव कडू व नाना कडू यांनी दिली. गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून गावातील आवश्यक असणारा किमान रस्ता आमदार व खासदारांकडून करण्यात न आल्याबद्दल त्‍यांनी तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यवधी रुपयांच्या कामांची अंदाजपत्रके पूरहानी संदर्भात शासनाकडे पाठविण्यात आली आहे. तातडीची गरज म्हणून या पुलांची दुरुस्ती होणे आवश्यक असताना संबंधित यंत्रणांकडून कार्यवाही का झाली नाही, अशी विचारणा ग्रामस्थांकडून हाेत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कावले -बावले खिंडीतील झालेली लढाई आजही इतिहासात नोंद घेणारी ठरली आहे. या दोन जोडीच्या गावांतून या खिंडीचा इतिहास प्रतिवर्षी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून जपला जाताे. याच गावातील ही असलेली विदारक स्थिती पाहता शासकीय यंत्रणाची उदासीनता पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून येते असल्‍याची चर्चा ग्रामस्‍थांमध्‍ये हाेत आहे.

शाळकरी मुलांची पायपीट

शाळेतील मुलांना देखील या पुलाचाच वापर करावा लागत असल्याने नागरिकांना या मुलांसाठी स्वतः शाळेपर्यंत यावे लागत आहे.

बावले गावामध्ये चौथीपर्यंत प्राथमिक शाळा असून पुढील शाळेतील शिक्षणासाठी गावात नसलेल्या आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना शाळेसाठी किमान पाच किलोमीटर चालत जावे लागते.

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावांतील या किमान नागरी सुविधेकडे आजपर्यंत झालेल्या दुर्लक्षाबद्दल तालुक्यातून संतापाची भावना निर्माण होत असून, शासनाने युद्धपातळीवर या गावाचा पूल व किमान आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्‍थांकडून होत आहे.

हेही वाचलं का?

Back to top button