सीमावादाबाबत मुख्यमंत्री बोलत नाहीत ही आश्चर्याची बाब : दिलीप वळसे पाटील | पुढारी

सीमावादाबाबत मुख्यमंत्री बोलत नाहीत ही आश्चर्याची बाब : दिलीप वळसे पाटील

पनवेल, पुढारी वृत्‍तसेवा : कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नाबाबत केंद्र सरकारने ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना वेगळ्या प्रकारची आंतरिक भुमिका घेतली जाते. संबंधित राज्याला केंद्र सरकारने समज दिली पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याबाबत काही बोलत नाहीत ही आश्चर्याची बाब आहे. कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक भूमिका घेत असताना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने सरकारने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे. नागरिकांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना सुरक्षा देणे ही सरकारची जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

कामोठे येथे माजी आमदार दत्तूशेठ पाटील इंटरनॅशनल स्कुलमध्ये शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्था रायगड विभागाचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कृतज्ञता सप्ताहनिमित्त ४० हजार स्क्वेअर फुटी महारांगोळीचे उद्घाटन माजी गृहमंत्री तथा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले, कर्नाटक-महाराष्ट्र असू दे, समाजामधील अंतर असू दे किंवा जातींमधील दुरी असू दे, असे विविध प्रश्न असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केले. त्याच छत्रपतींचा विचार आता शरद पवार शाहु, फुले, आंबेडकरांच्या नंतर शांतपणे राबवण्याचा आणि समाजापर्यंत घेऊन जाण्याचे काम करत आहेत. म्हणून शरद पवार यांच्याबद्दल महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेच्या मनात आदर आणि प्रेम आहे.

शरद पवारांनी समाजाला खूप काही दिले आहे. त्या बदल्यात आपण त्यांना काय देऊ हे माहीत नाही. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम प्रकृती आणि दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि आपल्या रयत शिक्षण संस्थेला त्यांचे अधिकाधिक मार्गदर्शन लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. रामशेठ ठाकूर यांचे रयतच्या कार्यक्रमांना नेहमीच पाठबळ लाभते. त्यांचा हात नेहमीच वाहताच असतो. त्यांच्या सहकार्यबद्दल बोलण्यासाठी शब्द कमी पडतील, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सप्ताहनिमित्त आज महारांगोळीचे उद्घाटन माजी आमदार दत्तूशेठ पाटील इंटरनॅशनल स्कूल कामोठे येथे करण्यात आले होते. तर प.जो.म्हात्रे विद्यालय व आ.धों.म्हात्रे ज्युनिअर कॉलेज, आय टी आय नावडे येथे भव्य खुल्या गटातील रांगोळी स्पर्धा, चित्रकला व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार यांचे रांगोळी पोर्ट्रेट रयत शिक्षण संस्थेतील कलाशिक्षक मंगेश खुटारकर, रमेश खुटारकर व चेतन भोईर यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन उत्तम पद्धतीने रेखाटले आहे. या रांगोळीचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

Back to top button