पुणे : रांजणगाव एमआयडीसीत अवैध व्यवसायांना ऊत

पुणे : रांजणगाव एमआयडीसीत अवैध व्यवसायांना ऊत

रांजणगाव गणपती : पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव गणपती येथील एमआयडीसी परिसरापासून ते गावांच्या वेशीपर्यंत सर्वत्र जुगार – मटक्यापासून गावठी दारूविक्रीपर्यंतचे अवैध धंदे जोमात सुरू आहेत.

रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळले आहेत. पोलिस कारवाईऐवजी हप्ता वसुलीत मग्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अशातच गुन्हेगारीची पार्श्वभूमी लक्षात घेता शासनाने नुकतेच शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांची नव्याने नियुक्ती केली आहे.

सजग नागरिकांनी वारंवार अवैध धंदे सुरू असल्याबाबतच्या तक्रारी केल्या आहेत. मटका, जुगार आणि हातभट्टी दारूविक्री, गुटखा विक्रीचे प्रकार सर्वाधिक आहेत. पोलिसांनाही हे अवैध धंदे प्रत्यक्ष संबंधित ठिकाणी सुरू असल्याचे आढळूनही आले आहे. मात्र अद्यापही कारवाइ का होत नाही हा सवाल आहे. सामान्य नागरिकांनी तक्रार करायची तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

परवाने नसताना अनेक हॉटेल व्यावसायिक मद्यविक्री करत आहेत. अशा ठिकाणी कर्मचार्‍यांपासून ते वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत प्रत्येकाचे वेगळे हप्ते वसूल होतात का? गावोगावचे पोलिस पाटीलही याबाबत तक्रारींचा अहवाल पोलिसांना देतात का नाही आदी प्रश्न विचारले जात आहेत. आगामी काळात अवैध धंद्यावर पोलिस कशा पद्धतीने कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा केली असता त्यांनी तोडकी- मोडकी उत्तरे दिली. प्रत्यक्षात रांजणगाव परिसरात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. परिणामी गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे चित्र आहे.

गुन्हेगारी संपवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. अवैध व्यवसायाबाबत गुन्हे दाखल केले जात आहेत. अवैध व्यवसायांना आळा घालण्यासही प्रयत्नशील आहोत.

                                              – यशवंत गवारी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news