पुढारी ऑनलाईन डेस्क :
सरकारी नोकर्यांच्या प्रतिक्षेत असणार्या तरुणांसाठी खूशखबर आहे. पुढील दीड वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक पदावरील भरती करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. ही भरती केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांच्या माध्यमातून केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांची समीक्षा केल्यानंतर संबंधित आदेश दिले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने ( पीएमओ ) यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांच्या मनुष्यबळ स्थितीची समीक्षा केली. पुढील दीड वर्षांमध्ये १० लाख नोकर्या उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल महिन्यात नोकर भरतीसंदर्भात वरिष्ठ अधिकार्यांबरोबर बैठक घेतली होती. युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त असणार्या सर्व पदाची भरती करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे आदेश त्यांनी दिले होते.
मागील काही दिवस बरोजगारीच्या मुद्यावर विरोधी पक्षांकडून केंद सरकारवर टीकेची झोड उठली होती. यानंतर आता केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर भरती मंजुरी दिला आहे. ही भरती पुढील दीड वर्ष म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत होणार आहे. आता केंद्र सरकारच्या घोषणेमुळे बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.