मुंबई : पुढारी वृत्तसेवा; यापुढे मद्य प्राशन करून बस चालवल्यास चालक किंवा वाहकास सरळ बडतर्फ करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. या संदर्भात एक नियमावलीच महामंडळाने जारी केली. कामावर जाणा-या चालक/ वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करुनच वाहतूक नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रकाने चालक/वाहकांना बसवर पाठविणे आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.
कामगिरीवरील सर्व चालकांनी मद्यप्राशन केलेले नाही, याची तपासणी व खात्री करुनच वाहन परीक्षक यांनी वाहन चालकांच्या
ताब्यात द्यावे. वाहतूक नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रकाने चालकाने मद्यप्राशन केलेले नाही, याची खात्री करुनच बस स्थानकावरुन बस मार्गस्थ करण्यात यावी. वाहतूक नियंत्रक/पर्यवेक्षक/ वाहन परीक्षक यांना कामगिरीवर हजर होणारे चालक मद्यप्राशन केलेले आढळल्यास, स्थानक/आगार प्रमुख यांना याची माहिती देतील. संबंधित चालकाला कामगिरीवरुन उतरुन घेतील व त्वरित त्याबाबत नियमांनुसार, वैद्यकीय चाचणी, पोलीस फिर्याद व प्रमादीय कारवाई करतील.
आगाराच्या नियंत्रणाखालील सर्व बसस्थानकात वरील कार्यपध्दतीची अंमलबजावणी केली जाईल याची जबाबदारी आगार व्यवस्थापक यांची राहील. ज्या आगारात अल्कोहोल टेस्ट मशिन उपलब्ध आहे त्या आगारांनी स्वतःच्या व इतर आगारांच्या मार्गस्थ होणार्या बसेसच्या चालकांची प्रामुख्याने लांब पल्ला रातराणी बसेसची तपासणी करावी व त्याची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये घेण्यात यावी. चालकांनी कामगिरीवर असतांना मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळल्यास सेवेतून बडतर्फी हीच शिक्षा दिली जाईल आणि याची कल्पना सर्व वाहक, चालकांना देण्याचे आदेशही महामंडळाने आगारांना दिले आहेत.
हेही वाचा