मविआ-भाजपमध्ये सामना, विधान परिषदेचीही लढत चुरशीची; १० जागांसाठी ११ उमेदवार | पुढारी

मविआ-भाजपमध्ये सामना, विधान परिषदेचीही लढत चुरशीची; १० जागांसाठी ११ उमेदवार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जून रोजी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने आता या निवडणुकीतही महाविकास आघाडी (मविआ) आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होऊ घातली आहे.
या निवडणुकीसाठी भाजपने सहा, राष्ट्रवादीने तीन आणि शिवसेना, काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 13 उमेदवारांपैकी भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिरिक्‍त उमेदवार शिवाजी गर्जे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र भाजप पाच जागा लढण्यावर ठाम
राहिला तर

काँग्रेसनेही एक उमेदवार मागे घेण्यास नकार दिला. भाजप आणि काँग्रेसने आपला अतिरिक्‍त उमेदवार कायम ठेवल्याने निवडणूक अटळ झाली. या निवडणुकीतही भाजपने पाचवी जागा निवडून आणण्याचा दावा केल्याने काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप किंवा चंद्रकांत हंडोरे हे डेंजर झोनमध्ये असल्याचे मानले जात आहे.

आमदार फुटण्याची भीती

संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर काँग्रेसचा एक सदस्य निवडून जाऊ शकतो. आता राज्यसभेप्रमाणे या निवडणुकीतही आमदारांची रस्सीखेच सुरू होणार असून महाविकास आघाडीपुढे पुन्हा एकदा मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी तब्बल 22 मते लागतील. राज्यसभा निवडणुकीत पराभवाची नामुष्की ओढवल्याने विधान परिषदेची निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी, असा सूर महाविकास आघाडीत होता. राज्यसभा निवडणुकीत खुली मतदान पद्धती असतानाही आघाडीची मते फुटली. आता विधान परिषदेसाठी तर गुप्त मतदान असल्याने आणखी एक फटका बसण्याची भीती शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांना आहे. मात्र माघार कुणी घ्यायची यावर एकमत झाले नसल्याने आघाडीचे सहा उमेदवार रिंगणात राहिले. परिणामी राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेची निवडणूकही चुरशीची होईल.

भाजपचे उमेदवार : प्रा. राम शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे.
भाजपचे गणित : पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी किमान 135 मतांची गरज आहे. भाजपकडे स्वतःची 106 आणि पाठिंबा देणारे छोटे पक्ष व अपक्ष मिळून 113 आमदारांचे संख्याबळ आहे. म्हणजे भाजपला किमान अतिरिक्‍त 22 मतांची गरज आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार : रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे
राष्ट्रवादीचे गणित : राष्ट्रवादीकडे 53 मते असली तरी त्यांचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. कोर्टाने परवानगी दिली तरच ते मतदान करतील. पण सध्या 51 मते राष्ट्रवादीकडे आहेत. दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी तीन मतांची त्यांना गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडूनही काँग्रेसच्या दुसर्‍या उमेदवाराला एकही मत मिळणार नाही.
शिवसेनेचे उमेदवार : सचिन अहिर, आमशा पाडवी
शिवसेनेचे गणित : शिवसेनेकडे 55 मते असून त्यांच्या दोन उमेदवारांनाच हा कोटा दिला जाईल.

काँग्रेसचे उमेदवार : चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
काँग्रेसचे गणित : काँग्रेसला दोन जागा जिंकण्यासाठी 54 मतांची गरज आहे. काँग्रेसकडे स्वतःचे 44 आमदार आहेत. काँग्रेसला अतिरिक्‍त 10 मतांची गरज आहे. भाई जगताप किंवा हंडोरे यापैकी एकास आणखी दहा मतांची गरज आहे. काँग्रेसचा हा दुसरा उमेदवार डेंजर झोनमध्ये आहे. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे शिल्‍लक मते नाहीत.

Back to top button