दुहेरी हत्याकांडाचे तपासी अधिकारी बदलले; सासवडमधील कचरावेचक खून प्रकरण

दुहेरी हत्याकांडाचे तपासी अधिकारी बदलले; सासवडमधील कचरावेचक खून प्रकरण
Published on
Updated on

सासवड : पुढारी वृत्तसेवा

सासवड येथे दोन कचरा वेचकांच्या खून प्रकरणातील तपास अधिकारी सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना तडकाफडकी बदलण्यात आले असून, आता हा तपास भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्याच्या पार्श्वभूमीवर तपास अधिकारी बदलण्याच्या घटनेकडे पाहिले जात आहे. या प्रकारामुळे राजकीय वातावरणही तापले आहे. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी सासवडला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि अत्यंत बारकाईने सर्व प्रकरणाची माहिती घेतली.

माजी मंत्री, शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी या दुहेरी खूनप्रकरणी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. आमदार संजय जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस यंत्रणा आणि वैद्यकीय अधिकार्‍यांना हाताशी धरून प्रकरण दडपल्याचा आरोप करून चौकशीची मागणी केली आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. आमदार संजय जगताप यांनीही चौकशी होऊनच जाऊ द्या, अशी ठाम भूमिका घेतली आहे. शिवतारे यांच्या आरोपांनाही आमदार जगताप यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. या राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे सासवडचे वातावरण अत्यंत तापले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही या प्रकरणी तज्ज्ञांमार्फत चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. आताचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्यावर होत असलेल्या आरोपाची दखल घेऊन भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्याकडे तपासाची सूत्रे दिली आहेत.

या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी( दि 4) सासवड पोलीस स्टेशनला भेट दिली. या वेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाचा आढावा घेतला. सासवड पोलीस स्टेशनच्या भिंतीच्या मागेच अंडाभुर्जीची हातगाडी चालविणार्‍या नीलेश जगताप याने दुकानासमोर बसलेल्या तीन कचरावेचकांना बांबूने बेदम मारहाण करून कढईमधील उकळते पाणी त्यांच्या अंगावर टाकल्याने यातील दोघांचा मृत्यू झाला होता.

पोलीस स्टेशन जवळच एवढी मोठी घटना घडूनही पोलिसांकडून काहीही कारवाई झाली नव्हती. सासवड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपासमारीने आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली. 24 तासाच्या आत ओळख न पटवता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, काही व्यक्तींनी या घटनेला वाचा फोडल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news