पुणे : सारसबाग चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलसमोरील 10 फूट फरशी काढण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी नियोजन केलेल्या वॉकिंग प्लाझाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, स्टॉलच्या बाहेर टेबल आणि खुर्च्या लावण्यास मज्जाव करणार्या महापालिका प्रशासनाने स्टॉलच्या समोरील 10 फूट जागा वापरण्यास तूर्तास मुभा दिली आहे.
महापालिकेच्या वतीने मागील काही दिवसांपासून अतिक्रमणांविरोधात मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत सारसबाग चौपाटीवर कारवाई करून स्टॉलच्या समोरील शेड, टेबल, खुर्च्या व इतर साहित्य जप्त केले होतेे. येथील व्यावसायिकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलत येथील सर्व स्टॉल सील केले होते.
त्यामुळे चौपाटीवरील स्टॉल तीन ते चार आठवडे बंदच होते. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बैठक घेतली. यावेळी सारसबाग चौपाटीवर वॉकिंग प्लाझा करण्याचा आणि येथील स्टॉलधारकांकडून टेबल, खुर्च्या मांडणार नाही, नियमांचे उल्लंघन करणार नाही, असे हमीपत्र घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार स्टॉलधारकांनी हमीपत्र देऊन आपले व्यवसाय सुरू केले आहेत.
बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेने वॉकिंग प्लाझा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून स्टॉलसमोरील 10 फूट फरशी काढण्यात आली आहे. फरशी काढलेल्या ठिकाणी वॉकिंग प्लाझा करण्यात येणार आहे. प्रशासनाने स्टॉलसमोरील 10 फूट फरशी तशीच ठेवून ती जागा वापरण्याची मूभा तूर्तास दिली आहे. त्यामुळे स्टॉलधारकांना दहा फुटांच्या जागेत टेबल आणि खुर्च्या ठेवता येत आहेत.
हेही वाचा