हनुमंत देवकर
महाळुंगे इंगळे : एकीकडे हजारो हेक्टरवर वृक्षारोपण करणार्या संस्था, तर दुसरीकडे टेकड्या जमीनदोस्त करून उभे राहणारे उद्योग, कारखाने हा विरोधाभास सध्या पाहायला मिळत आहे. टेकड्यांचे संरक्षण करण्याऐवजी लचके तोडण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र चाकण औद्योगिक परिसरात पाहावयास मिळत आहे.
डोंगर, टेकड्या फोडून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी करणारे व टेकड्यांचे सौंदर्य नष्ट करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी निसर्ग व पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणावर केमिकल उघड्यावर सोडून प्रदूषण करीत आहेत. तसेच पिंपरी-चिंचवडमधील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी नदीला सोडल्याने नदी प्रदूषित होऊन नदीला बाराही महिने जलपर्णीचा वेढा पडत आहे.
चाकण औद्योगिक परिसरातील खराबवाडी, वाघजाईनगर, कडाचीवाडी, महाळुंगे इंगळे, कुरुळी, निघोजे, वराळे, कोरेगाव खुर्द, भांबोली, वाकी, रासे, चिंबळी, केळगाव या गावांमध्ये अनधिकृतपणे टेकड्या फोडून मुरूम व डबर या गौण खनिजाचे उत्खनन गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. डोंगर, टेकड्या फोडून उद्योजकांनी अक्षरश: डोंगर कपारीमध्ये कारखाने उभे केले आहेत.
याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले असून अशा ठिकाणी संबंधित खात्यांनी बांधकाम परवानगी दिली कशी, असा प्रश्न नागरिकांपुढे उभा आहे. वाघजाईनगर येथे तर अख्खा डोंगर फोडून त्यात औद्योगिक शेड बांधण्यात आल्या आहेत.
चाकण एमआयडीसीतील काही कंपन्यांनी रसायनयुक्त सांडपाणी लगतच्या ओढ्यांना व रस्त्यांवर सोडले आहे. काही दिवसांनी प्रदूषणापासून 'वाचवा रे वाचवा' अशी आर्त हाक देण्याची माणसांवर वेळ येणार आहे. महसूल विभागाने दंडात्मक कारवाई करूनही टेकड्यांचे सर्रास उत्खनन चालूच आहे.