सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनामध्ये आई व वडील गमावलेल्या मुलांना पंतप्रधानांनी 'पीएम केअर्स' योजना सुरू केली आहे. त्याअनुषंगाने पात्र उमेदवारांसाठी 260 पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रत्येक अभ्यासक्रमासाठी दोन या प्रमाणात जागा उपलब्ध राहणार आहेत.
या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या 'स्वनाथ' योजनेंतर्गत पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. दरवर्षी तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत पदविका स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येते असते. शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील इयत्ता 10 वी नंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2 जूनपासून सुरू झाली आहे. पदविका प्रवेशासाठीचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रकियेचा तपशील, महत्त्वाच्या सूचना तसेच ऑनलाईन अर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे दहावी परीक्षेच्या निकालाअगोदरच पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना माहिती भरता येणार आहे. निकाल लागल्यानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे.
प्रवेशाच्या तीन फेर्या होणार
कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22 या वर्षामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेर्या घेण्यात आल्या होत्या. शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या 3 फेर्या घेण्यात येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.