हंजगी : पुढारी वृत्तसेवा : शंभर मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस अथवा जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय शेतकर्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी यांनी शेतकर्यांना केले आहे.
तालुक्यात काही भागात बर्यांपैकी मान्सून पूर्व पाऊस झाला आहे. यामुळे काही शेतकरी घाई गडबडीत सध्या खरीप पेरणी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कृषी अधिकार्यांनी शेतकर्यांना पुरेशा ओलशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन केले.
माळी म्हणाले, अक्कलकोट तालुक्यातील शेतकर्यांनी बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवाना धारक कृषी सेवा केंद्रातून खरेदी करावीत. खरेदी करताना खरेदी केलेल्या बियाणे व खतांचा संपूर्ण तपशील बिल घेऊन विक्रेत्यांचे स्वाक्षरी असल्याची खात्री करून घ्यावी. अनुदानित रासायनिक खतांची खरेदी केल्यावर विक्रेत्याकडून ई-पास मशीनवरील बिल घ्यावे. खरेदी केल्यानंतर खताच्या पिशवीवरील किंमत व विक्रेत्याने दिलेले बिल तपासून पहावे. तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे टॅग वेस्टन पिशवी व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवावे. बियाण्याची पिशवी बंद असल्याची खात्री करावी व त्यावरील अंतिम मुदत पाहून नामांकित कंपनीचे बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करावी. शेतकर्यांनी उपलब्ध असलेल्या खतांमधून शिफारशीप्रमाणे पिकास खतमात्रा द्यावी.
जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला यावेळी कृषी अधिकारी रामचंद्र माळी यांनी दिला. आपल्या भागात सोयाबीन वरील खोडमाशी, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सोयाबीनचे बियाणे 4 सेमी पेक्षा जास्त खोलीवर पडू नये, याची काळजी घ्यावी. शेतकरी बांधवांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तक्रार लेखी स्वरुपात स्वीकारले जाणार आहे. तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी अक्कलकोट, पंचायत समिती कृषी अधिकारी अक्कलकोट, तसेच क्षेत्रीय कर्मचारी यांच्याकडेदेखील तक्रार करता येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी यांनी सांगितले.