

बाजीराव गायकवाड
सहकारनगर-पद्मावती प्रभागात (क्र. 36) भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पश्चिम विभागाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांची प्रतिष्ठा या प्रभागात पणाला लागणार असून, या नेत्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. गेल्या काळात झालेल्या राजकीय बदलामुळे या प्रभागातील निवडणूक अटातटीची होणार आहे.
प्रभागाची लोकसंख्या 84 हजार 660 इतकी आहे. यात अनुसूचित जाती प्रवर्गातील 19 हजार 596 आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाची संख्या 612 इतकी आहे. महापालिकेची अंतिम प्रभागरचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभागात इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), या तीन पक्षांमध्ये खरी लढत होणार आहे. या प्रभागात भाजपसह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे.
गेल्या निवडणुकीत (2017) भाजपच्या साईदीशा माने आणि महेश वाबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम व काँग्रेसचे आबा बागुल यांनी विजय मिळविला होता. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांना या प्रभागाने संधी दिली होती. आता आगामी निवडणुकीसाठी प्रभाग 36 ची रचना भाजपसाठी अनुकूल मानली जात आहे. मात्र, सहकारनगर आणि पद्मावती परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे तसेच काँग्रेसचेही काही प्रमाणात प्राबल्य आहे. या पक्षांच्या इच्छुकांकडून आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. विशेषत: वस्ती पातळीवरील मतदान आणि स्थानिक जातीय समीकरणे पाहता या प्रभागात कोणत्याही एका पक्षाला सहज विजय मिळवता येणार नाही, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
या प्रभागात राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पश्चिम विभागाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. भाजपमध्ये इच्छुकांना उमेदवारी देताना त्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देणार की, अलीकडे पक्षात आलेल्या नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देणार, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
या प्रभागात अनुसूचित जाती प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण प्रवर्ग अशी आरक्षणे आहेत. गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे जगताप यांनी सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढविली होती. मात्र, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिवलाल भोसले यांनी बंडखोरी केली होती, यामुळे मतांचे विभाजन झाल्याने जगताप यांचा पराभव झाला होता. आता अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित या जागेवरून राष्ट्रवादी पवार गटाच्या अश्विनी कदम यांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर झाला आहे. तर भाजपचे माजी नगरसेवक महेश वाबळे हे सर्वसाधारण जागेवरून पुन्हा इच्छुक असून माजी नगरसेविका साईदिशा माने आता पुन्हा निवडणुकीत उतरणार का याबाबत साशंकता आहे. तर माजी नगरसेवक आबा बागुल यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने त्यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली आहे. त्यामुळे आता बागुल काय भूमिका घेणार आणि कोणत्या पक्षातून निवडणूक लढविणार याबाबत उत्सुकता आहे.
सध्याचे राजकीय चित्र पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार, असे दोन गट तयार झाले आहेत. तसेच शिवसेनेतही ठाकरे आणि शिंदे गट, अशी विभागाणी झाली आहे. यामुळे या पक्षांच्या मतांमध्ये विभाजन होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. तर भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तिकीट वाटपानंतर नाराजी नाट्य होऊन बंडोखोरी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र, सध्या तरी या प्रभागात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत होईल असेच चित्र आहे.
जगताप-कदमांचे मनोमिलन होणार का?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र असताना गत महापालिका निवडणुकीत सुभाष जगताप यांचा पराभव झाल्याने अश्विनी कदम यांच्याशी त्यांचा संघर्ष निर्माण झाला. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुकीत एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी जगताप आणि कदम यांचे मनोमिलन होऊन ते एकत्र येऊन निवडणूक लढविणार का याबाबत उत्सुकता आहे.
विविध पक्षांतील इच्छुक उमेदवार
भाजप : महेश वाबळे, प्रशांत थोपटे, गणेश घोष, गणेश गांधी, अनिरुद्ध भोसले. राष्ट्रवादी काँग्रेस
(अजित पवार गट) : सुभाष जगताप, सुशांत ढमढेरे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : अश्विनी कदम, नितीन कदम, तुषार नांदे, नीलेश खंडाळे. काँग्रेस : सतीश पवार, संतोष गेळे, अनिल सातपुते.
शिवसेना (शिंदे गट) : श्रुती नाझीरकर, नितीन लगस. आबा बागुल हे सुद्धा निवडणूक लढवणार आहेत.