

वेल्हे : बिबट्यांच्या वाढत्या हल्यामुळे सिंहगडसह पानशेत भागातील नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे. सिंहगड परिसरात 10 पेक्षा अधिक बिबटे तसेच बछडे असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सिंहगड पायथ्याच्या गोऱ्हे खुर्द, घेरा सिंहगड, थोपटेवाडी, मालखेड, खाटपेवाडी, खरमरी आदी ठिकाणी बिबट्यांनी कुत्री, वासरे, गायी अशा जनावरांचा फडशा पाडला आहे. परिणामी नागरिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सिंहगड भागातील नागरी वस्त्या, कंपन्या, फार्म हाऊस आदी ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते धनराज जोरी व स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत जोरी यांनी सिंहगड वन विभागाला निवेदन दिले आहे. या वेळी स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
मालखेड येथील वेंकी कंपनी, तसेच जवळील उसाच्या शेतात बिबट्याची एक मादी व एक बछडा अधूनमधून येत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. पानशेत वन विभागाचे वनरक्षक राजेंद्र निंबोरे हे वेल्हे येथून रांजणे पाबे घाट रस्त्याने खानापूर येथे येत असताना सोमवारी (दि. 1) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मणेरवाडी येथील तिरंगा हॉटेलजवळ एक बिबट्या रस्ता ओलांडताना दिसला. सिंहगड, पानशेतच्या जंगलात धष्टपुष्ट व आकाराने मोठे असलेले बिबटे आहेत. त्यामुळे बिबटे लहान जनावरांसह म्हैस, गायी, चितळ सांबर अशा मोठ्या जनावरांची शिकारही करत आहेत.
नारायणगाव : वारुळवाडी हद्दीमध्ये मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबाच्या चार शेळ्या बिबट्याने जागीच ठार केल्या, तर एका शेळीच्या मानेला गंभीर दुखापत करण्यात आली आहे. यामुळे या गरीब शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी (दि. 3) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
वारुळवाडी येथील राजेंद्र शंकरराव मेहेर यांची शेती अशोक आगलावे हे करीत आहेत. अशोक आगलावे यांनी मेहेर यांच्या घराशेजारी भिंतीला लोखंडी जाळी मारून यामध्ये सहा शेळ्या ठेवल्या होत्या.
सिंहगडच्या जंगलात अनेक वर्षांपासून बिबट्यांचा अधिवास आहे. घनदाट जंगल आणि जंगलात मिळणारी वन्यप्राण्यांची शिकार अशा पोषक वातावरणामुळे बिबट्यांची संख्या अलीकडे वाढली आहे. नागरी वस्त्यांमध्ये बिबट्या येऊ नये तसेच मनुष्यहानी होऊ नये यासाठी गावोगाव जाऊन जनजागृती केली जात आहे.
समाधान पाटील, वन परिमंडळ अधिकारी, सिंहगड वन विभाग
या भागात स्थानिक रहिवाशांपेक्षा पर्यटकांची वर्दळ अधिक आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. गावोगाव सुरू असलेल्या कीर्तन सोहळ्याला रात्रीच्या वेळी जाणे धोक्याचे झाले आहे.
आशा पासलकर, माजी सरपंच, पानशेत