

पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवारी 12 नगरपरिषदा व तीन नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानात चार नगरपरिषदांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त होती. यामुळे लोणावळा, इंदापूर, जेजुरी आणि भोर नगरपरिषदेच्या निकालात लाडक्या बहिणी गेंमचेंजर ठरणार आहेत.
यानिवडणुकीत 3 लाख 6 हजार 722 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 1 लाख 55 हजार 835 पुरुष, तर 1 लाख 50 हजार 876 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदानात महिलांपेक्षा पुरुष मतदारांची संख्या पाच हजारांनी अधिक होती. त्यामुळे बहुतांश नगरपरिषदांमध्ये महिला मतदारांचा कल निर्णायक ठरणार आहे.
जिल्ह्यातील 14 नगरपरिषदा व तीन नगरपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने बारामती व फुरसुंगी, उरुळी देवाची या दोन नगरपरिषदांची मतदानाची तारीख पुढे ढकलली गेली. त्यानंतर मंगळवारी (दि. 2) उर्वरित 12 नगरपरिषदा व तीन नगरपंचायतींसाठी मतदान झाले. त्यात सरासरी 68 टक्के मतदान नोंद करण्यात आली. लोणावळा इंदापूर, जेजुरी व भोर या चार नगरपरिषदांसाठी मतदान करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या चारही ठिकाणचा निकाल महिला ठरवणार आहेत.
एकूण मतदानाचा विचार केल्यास तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत सर्वाधिक 64 हजार 679 मतदार होते. त्यातील 31 हजार 846 मतदारांनी मतदान केले. त्यात 16 हजार 555 पुरुष, तर 15291 महिलांचा समावेश आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत हे मतदान केवळ 49.24 टक्के इतके आहे. जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान याच नगरपरिषदेसाठी झाले आहे, तर अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या इंदापूर नगरपरिषदेत सर्वाधिक 79.89 टक्के मतदानाची नोंद झाली. येथे एकूण मतदारांची संख्या 24 हजार 829 असून 19,837 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 9 हजार 750 पुरुष व 10 हजार 83 महिला मतदारांचा समावेश आहे.