

पुणे : औंध जिल्हा रुग्णालय परिसरातील आयुष रुग्णालय सुरू होऊन दीड वर्ष पूर्ण होत असताना उपचारांची मागणी सातत्याने वाढत आहे. मार्च 2024 पासून कार्यरत असलेल्या या 30 बेडेड रुग्णालयात आयुर्वेदातील पंचकर्मसारखे उपचार मोफत मिळत आहेत.
योग, नॅचरोपथी, युनानी आणि होमिओपथी उपचार एकाच छताखाली निशुक्ल उपलब्ध आहेत. दररोज सरासरी 130 ते 140 रुग्ण उपचारासाठी येत आहेत. फेबुवारी 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत बाह्यरुग्ण विभागात 48,372 रुग्णांनी उपचार घेतले आहेत, तर 6879 नागरिकांनी पंचकर्म प्रक्रिया करून घेतली आहे.
रुग्णालयात नियमित योगा सत्रांसह ऋतुनुसार पंचकर्मासह इतर आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि युनानी उपचार केले जातात. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आहार-विहार मार्गदर्शनही केले जाते.
पद्धतीने वैद्यकीय पार्श्वभूमीची माहिती भरण्याची आणि उपचारांबद्दल अभिप्राय नोंदवण्याची सोय डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सांधेदुखी, पचनसंस्थेचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब होऊ नये म्हणून किंवा झाला असल्यास नियंत्रणात ठेवण्यासाठी उपचार दिले जातात. त्यामुळे आयुष रुग्णालयास पसंती वाढत आहे. सर्व वयोगटांतील नागरिक येथे येतात.
पक्षाघात, मणक्यांचे विकार, त्वचारोग, लहान मुलांमधील ऑटिझमसारख्या तक्रारी, तसेच मानसिक आरोग्य समस्यांवरही उपचार केले जातात.
अग्निकर्म, विरेचन, बस्ती, शिरोधारा, कपिंग, रक्तमोक्षण, कटीबस्ती यांसारख्या प्रक्रिया नियमितपणे केल्या जातात.
कॅन्सर रुग्णांच्या केमोथेरपीमुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठीही येथे विशेष उपक्रम राबवले जातात.
नॅचरोपथी पद्धतींचाही समावेश असल्याने रुग्णांना एकात्मिक पद्धतीने उपचार उपलब्ध होत आहेत.
आजकालची बदलती जीवनशैली आणि आहारविहार यामुळे वेगवेगळे आजार उद्भवत आहेत. मूळव्याध, भगंदर अशा आजारांमध्ये अनेकदा तीव वेदना, दुखणे बरे करण्यासाठी शस्त्रक्रिया कराव्या लागतात. यासाठी आयुष रुग्णालयात क्षारसूत्र पध्दतीचा वापर केला जातो.
रुग्णालयाच्या परिसरात आयुष उद्यान तयार करण्यात आले असून शतावरी, वेखंड, आडुळसा, नागवेल, इन्सुलिन वनस्पती, तुळस, गवती चहा, आंबेहळद, आवळा, मोह, गुंजा अशी स्थानिक आणि उपयोगी औषधी वनस्पती विकसित केल्या आहेत. ओला-सुका कचरा व्यवस्थापनासाठी कम्पोस्टिंगची सोय उपलब्ध आहे.
रुग्णालयात सध्या योगा, आयुष, होमिओपॅथी, युनानी, नॅचरोपथी उपचार उपलब्ध आहेत. ओपीडी सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळेत चालते. आंतररुग्ण सुविधाही उपलब्ध आहे. प्रत्येक रुग्णाची डॉक्टरांकडून सखोल तपासणी केली जाते. निदानानुसार उपचारांची दिशा ठरवली जाते, तसेच प्रतिबंधात्मक उपचारही केले जातात. मधुमेह व रक्तदाबाच्या गुंतागुंती कमी करण्यासाठीही विशेष उपचार पद्धती वापरली जाते. उपचारांना नागरिकांकडून प्रतिसादही चांगला आहे. येथे सर्व सेवा पूर्णपणे निशुल्क आहेत. त्याचा जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.
डॉ. बालाजी लकडे, वैद्यकीय अधीक्षक, आयुष रुग्णालय, औंध