

पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला पुणे लिट फेस्ट फर्ग्युसन महाविद्यालय मैदानावरील सभामंडपात आजपासून सुरू होत आहे. सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात लेखन, इतिहास, संशोधन, समाज, प्रशासन, माध्यमे, तंत्रज्ञान, अध्यात्म आणि सांस्कृतिक वारसा अशा विविध विषयांवर देश-विदेशातील नामवंत वक्त्यांची सत्रे होणार आहेत.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रात बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. यानंतर लेखनातून स्वबोध या सत्रात अभिजित जोग आणि प्रशांत पोळ लेखनातून आत्मभानाचा प्रवास उलगडणार आहेत. राखीगढी संशोधन या विषयावर डॉ. वसंत शिंदे प्राचीन संस्कृतीवरील संशोधन मांडणार असून, राष्ट्रीय सुरक्षेसमोरचे धोके या चर्चेत जयंत उमराणीकर आणि प्रवीण दीक्षित समकालीन आव्हानांवर प्रकाश टाकणार आहेत. दिवसाचा समारोप तंबी दुराई आणि ब्रिटिश नंदी या विषयावरील अनौपचारिक गप्पांनी होणार आहे.
दुसऱ्या दिवशी प्रशासन, उद्योजकता आणि संशोधनावर केंद्रित सत्रे होणार आहेत. प्रशासनात वावरताना या चर्चेत अश्विनी भिडे आणि मनीषा खत्री प्रशासनातील अनुभव मांडणार आहेत. उद्योजकतेविषयी हनुमंतराव गायकवाड आणि विलास शिंदे उद्योगविश्वातील आव्हाने सांगणार आहेत. इतिहासाचार्य राजवाडे ते गजाननराव मेहेंदळे या परंपरेचा मागोवा घेणाऱ्या चर्चेत अविनाश धर्माधिकारी, डॉ. सागर देशपांडे हे ऐतिहासिक लेखन आणि संशोधनाचा प्रवास उलगडणार आहे. संशोधनपर चरित्रलेखनावर चर्चा होणार असून, या सत्रात नितीन सेठ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मानवी पैलूंवर संवाद साधणार आहेत. दिवसाचा शेवट 'भैरप्पा - एक पर्व' या विशेष सत्राने होणार आहे.
तिसऱ्या दिवशी उद्योग आणि साहित्य यांचा संगम अनुभवायला मिळणार आहे. आनंद देशपांडे 'माझी पुस्तकसफरी' या सत्रातून आपल्या वाचन-लेखन प्रवासाची कथा सांगणार आहेत. लेखनाच्या नव्या दिशा या चर्चेत अभिराम भडकमकर, ऋषिकेश गुप्ते आणि नितीन थोरात समकालीन लेखनप्रवृत्ती मांडणार आहेत. मराठी साहित्यातील बदलती पुरुष प्रतिमा या विषयावर सखोल चर्चा होणार असून, साहित्य आणि समाज या सत्रात शरणकुमार लिंबाळे साहित्याची सामाजिक भूमिका स्पष्ट करणार आहेत.
चौथ्या दिवशी सामाजिक-सांस्कृतिक आशयाची सत्रे रंगणार आहेत. 'मुंबईच्या कथा : अनेक अनुभव, अनेक प्रेरणा' या सत्रात मुर्झबान श्रॉफ सहभागी होणार आहेत. बानू मुश्ताक मुस्लिम महिलांच्या संघर्षकथा मांडणार आहेत. पत्रकार व माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर आपल्या वैचारिक प्रवासावर संवाद साधणार आहेत. 'दोन प्रवास, एक परंपरा' या सत्रात सचिन पिळगावकर आणि श्रिया पिळगावकर पिढ्यांमधील सांस्कृतिक वारसा उलगडणार आहेत. कथाकथनकार सिद्धार्थ काक, अभ्यासक अमी गणात्रा आणि अभिनेत्री गिरिजा ओक यांची सत्रेही या दिवशी होणार आहेत.
पाचव्या दिवशी इतिहास, पर्यावरण आणि जागतिक संवाद यांचा संगम साधला जाणार आहे. 'जिवंत वारसा' या सत्रात आधुनिक महानगरांच्या ऐतिहासिक कथा मांडल्या जाणार आहेत. ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार रिकी केज पर्यावरणपूरक संगीताचा अनुभव देणार आहेत. जागतिक मंचावर भारतीय साहित्याचे प्रतिनिधित्व या चर्चेत भारतीय साहित्याची आंतरराष्ट्रीय ओळख मांडली जाणार आहे. 'मोदी, माध्यमे आणि भारतासाठीची लढाई' या विषयावर राहुल शिवशंकर विचार मांडणार असून, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर 'कूटनीती ते संवाद' या सत्रातून भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रकाश टाकणार आहेत. 'निर्भय सत्य आणि गीतेचा संदेश' या सत्रात आचार्य प्रशांत आध्यात्मिक विचार मांडणार आहेत.
सहाव्या आणि शेवटच्या दिवशी साहित्य, कूटनीती आणि नेतृत्वावर आधारित सत्रे होणार आहेत. अभय के. भारताच्या सांस्कृतिक आवाजाचा प्रवास मांडणार आहेत. उद्योगविश्वातील बी. एस. नागेश जबाबदार नेतृत्वावर संवाद साधणार आहेत. माजी उच्चायुक्त अजय बिसारिया आणि रुची घनश्याम पाकिस्तानविषयीचे अनुभव सांगणार आहेत. 'नेहरूंपासून मोदींपर्यंत' या सत्रात शाहीद सिद्दीकी समकालीन राजकारणाचा साक्षीदार म्हणून अनुभव मांडणार आहेत. 'पुराण ते पांडुलिपी' या सत्रात अक्षत गुप्ता आपल्या लेखनप्रवासाचा वेध घेणार आहेत. पुणे लिट फेस्ट वाचक, विद्यार्थी आणि विचारवंतांसाठी सहा दिवसांची वैचारिक पर्वणी ठरणार आहे.