

पुणे : आपल्या संपूर्ण व्यवस्थेत सगळ्यात मोठी उणीव काही राहिली असेल तर केलेल्या कार्याचे दस्तऐवजीकरण न करणे ही सर्वात मोठी उणीव राहिलेली आहे. त्यामुळे आज आपल्याला जगाच्या विचाराचा आधार घ्यावा लागतो.
तक्षशिला तसेच नालंदा विद्यापीठातील पुस्तकांची माहिती आपल्याला चिनी प्रवासी वेन सँग याने जे लिहून ठेवले त्यातून होते. आपण कोणत्याही नोंदी ठेवल्या नाहीत, कोणत्याही प्रकारचे दस्तऐवजीकरण केले नाही. चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी नोंदी तसेच दस्तऐवजीकरण गरजेचे आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे लिखित गिनीजगाथा पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या जगात पुस्तके वाचली जातील का असा प्रश्न होता. मात्र, पुस्तकातील ज्ञान आणि माहितीचा संग्रह सर्वांना भावतो. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, नवनवे विक्रम होतात. त्याला पुणेकर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. मोठ्या संख्येने पुस्तके खरेदी करीत आहेत, ही बाब वाचन संस्कृतीला पुढे नेणारी आहे. पुस्तके आणि ग्रंथ माणसाच्या ज्ञानाच्या जाणीवा विस्तारतात. पुस्तकातून ज्ञान संपादित केल्याने व्यक्तिमत्त्व विकास विकास होतो. महाराष्ट्र हे क्रांतिकारी विचार आणि सामाजिक विचारांचे प्रमुख केंद्र आहे. राज्याला लेखक आणि जाणकारांनी समृद्ध केले आहे. पुणे पुस्तक महोत्सव हा राज्याची कला, संस्कृती आणि परंपरा पुढे नेणारा महोत्सव आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी महोत्सवाबाबत गौरवोद्गार काढले.
मलिक म्हणाले, पुणेकरांचा वाचन केवळ छंद नाही, तर त्यांची ती जीवनशैली आहे, हे पुणे पुस्तक महोत्सवाच्या यशातून सिद्ध झाले आहे. पुणे पुस्तक महोत्सव ही एक केस स्टडी झाला आहे. हा पुस्तक महोत्सव वेगळ्या उंचीवर गेला आहे. आतापर्यंतच्या पुणे पुस्तक महोत्सवात एकूण १३ विश्वविक्रम झाले आहे, हे अद्भुत आहे.
पांडे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाला दोन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली असून, दिवसेंदिवस नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. या पुणे पुस्तक महोत्सवात माझ्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे, ही माझी इच्छा आज पूर्ण झाली. या पुस्तकात माझ्या ४४ वर्षांचा जीवनप्रवास आहे. तो आपण सर्वांनी वाचावा. कुलकर्णी यांनी आभार मानले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याबद्दल एक पॅराग्राफ होता आणि मुघलांच्या संदर्भात 17 पाने होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुघलांना आता एका पानात आणले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसईमध्ये 21 पानांचा शिकवला जातो. इंग्रजांनी लिहीलेला इतिहास प्रमाण मानूनच आपल्याला इतिहास शिकवला जात होता. आज सुदैवाने देशातील उत्खनन, त्यातून मिळणारे ऐतिहासिक आणि वैज्ञानिक पुरावे यांनी जगाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.