

पुणे : राज्यात महानगर पालिका निवडणुकांचा बिगुल वाजताच सत्तासमीकरणं वेगाने घडू लागली आहे. पुण्यात महायुती होणार नसल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यात व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) हे समोरासमोर असेल, आमच्या एकत्रित आल्याने विरोधकांचा फायदा होऊ नये म्हणून आम्ही मैत्रिपूर्ण निवडणूक लढवणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात विविध विकास कामांच्या उद्घाटणानंतर मध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.
पुण्यात तब्बल ३ हजार कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा मंच येथे ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात कुठे कुठे महायुती आणि कुठे स्वतंत्र लढणार याची माहिती दिली.
फडणवीस म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा घोषित केल्याबद्दल मला खूप आनंद आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. कारण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे कारभार प्रशासकाच्या मार्फत चालवणे हे लोकशाहीला अभिप्रेत नव्हते. न्यायालयाच्या निर्णयामुळे दीर्घकाळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या. आता पुन्हा या निवडणुका होत आहेत. आम्हाला विश्वास आहे की आमच्या शासनाने केलेले काम पाहता पुन्हा लोक आमच्याच बाजूने कौल देतील, जनता आम्हाला पुन्हा शहर विकासाची संधी देतील.
फडणवीस म्हणाले, आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती होईल. तर काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती देखील पाहायला मिळेल. मात्र, पुण्यात व पिंपरीचिंचवड मध्ये आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. या बाबत अजित पवार यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. पुण्यामध्ये आम्ही दोन्ही मोठे पक्ष आहोत. भाजपने गेल्या पाच वर्षात पुण्याचा चांगला विकास केला आहे. त्यामुळे पुण्यात महायुती होणार नाही. मैत्रीपूर्ण लढत होतांना दोघांमध्ये कटुता येणार नाही, असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मराठी पंतप्रधान या संदर्भात प्रश्नला उत्तर देतांना फडणवीस म्हणाले, आता पर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना स्वप्न पडत होती, त्यांना साक्षात्कार होत होते हे आम्ही पहिले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा जेष्ठ नेता जे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत, पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री राहिले आहेत, त्यांना अशाप्रकारे साक्षतात्कार व्हायला लागले तर मात्र त्याच्यात काही तरी काळे बेरे आहे. पृथ्वीराज चव्हाण हे चांगले नेते आहेत. त्यांचे आरोग्य चांगले राहावे अशी शुभेच्छा त्यांना आहे. आशा प्रकारे विचार करून त्यांनी त्रास करून घेऊ नये असे फडणवीस म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्यावर कोर्ट निर्णय देईल तो अंतिम
आरक्षणाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेत आरक्षण हे ५० टक्यांच्या वर गेले आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की यांच्या निवडणुका घ्या, पण तो आमच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील, आम्ही जो निर्णय देऊ तो त्यांना बंधनकारक राहील.
निवडणुका या वेळेत व्हायला हव्या
मतदार यादीतील घोळ या प्रश्नावर बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे आम्ही देखील दाखवले आहे, पण त्याकरता निवडणुका घ्यायच्या नाहीत असे करता येणार नाही. गेले २०-२५ वर्षे जे लोक निवडणुका लढवत आहेत, त्यांना माहिती आहे कमी अधिक प्रमाणात मतदार यादीमध्ये घोळ असतोच. पण सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरही काही ना काही कारण काढून निवडणुका पुढे करा अशी ओरड करणे योग्य नाही. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असले पाहिजेत. त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे. म्हणून आमची मागणे आहे की निवडणुका वेळेवरच व्हाव्यात. हा घोळ संपवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील काळात या याद्या ब्लॉक चेन मध्ये टाकाव्यात, म्हणजे सगळाच घोळ संपून जाईल. येत्या काळात एसआयआर प्रक्रियामुळे मतदार याद्यातील घोळ कमी होईल.
आमच आणि शिंदे यांचं ठरलं
विरोधकांच्या पक्ष प्रवेशाच्या मुद्यावरून फडणवीस म्हणाले, राज्यात आमच्या पक्षात तरूणांचा येण्याचा ओघ मोठा आहे. कुणाला पक्षात घ्यायचे आणि कुणाला नाही हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष व त्या त्या ठिकाणचे शहराध्यक्ष निर्णय घेतील. मात्र, आमच आणि एकनाथ शिंदे यांचं ठरलं आहे, एकमेकांचे उमेदवार घ्यायचे नाही. त्यांच्या या उत्तरावरून उपस्थितांमध्ये हशा पिकला.
दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी फटका बसणार नाही
मुंबई महानगर पालिकेत दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी, नाही आले तरी तसेच कॉंग्रेसजरी त्यांच्यासोबत सहभागी झाले तरीही मुंबईकर महायुतीला निवडणूक देतील. आमचा कारभार, आम्ही केलेला मुंबईचा विकास, आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित सामान्य मुंबईकरांनी पहिलं असल्याने मुंबईकर आमच्या सोबत राहतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.