Khadakwasla Hill Rescue: कादवे डोंगरावर मध्यरात्री कड्यात अडकला २१ वर्षीय तरुण
खडकवासला: राजगड तालुक्यात कादवे येथील एका डोंगरावर फिरण्यासाठी गेलेला २१ वर्षीय तरुण रात्री कड्याच्या मध्यभागी अडकला. रात्रभर मदतीसाठी ओरडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिकांनी त्याचा आवाज ऐकला. तातडीने वेल्हा पोलिसांना माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणाला कड्याच्या धोकादायक भागातून सुखरूप बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश वर्मा (वय २१, रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश) हा तरुण रात्री कादवे परिसरातील डोंगरावर फिरण्यासाठी गेला होता. अंधार पडल्यामुळे त्याला पुढील मार्ग दिसत नव्हता. अचानक तो डोंगरावरील एका कड्याच्या मध्यभागी अडकला. समोर वर चढायला मार्ग नव्हता आणि खाली खोल दरी असल्यामुळे त्याची मोठी कोंडी झाली. आपण धोकादायक स्थितीत अडकलो आहोत हे लक्षात येताच त्याने वाचवा वाचवा म्हणून आवाज देण्यास सुरुवात केली. मात्र, रात्रीची वेळ, डोंगराळ आणि जंगली भाग असल्यामुळे त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे दीपेशने रात्रभर त्याच कड्यामध्ये मदतीच्या प्रतीक्षेत काढली.
दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास याच परिसरात असलेले स्थानिक नागरिक राहुल ठाकर यांनी ''बचाव बचाव'' असा आवाज ऐकला. आवाजाच्या दिशेने लक्ष केंद्रित केल्यावर डोंगराच्या कड्यामध्ये कोणीतरी अडकल्याची खात्री त्यांना झाली.
राहुल ठाकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता, तातडीने वेल्हा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांना या घटनेची माहिती दिली. शेवते यांनी याची दखल घेत कादवे गावाचे पोलीस पाटील भाऊसाहेब ढेबे यांना तसेच त्वरित आपत्ती व्यवस्थापन पथकाशी संपर्क साधला.
माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापनचे सदस्य उत्तम पिसाळ, अक्षय जागडे, वैभव जागडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना स्थानिक नागरिक राहुल ठाकर, दत्ता जागडे, संजय चोरघे, वैभव भोसले आणि पोलीस पाटील तानाजी भोसले यांची मोलाची साथ दिली.
बचाव पथकाने तत्परतेने नियोजन करून धोकादायक कड्यामध्ये अडकलेल्या दीपेश वर्मापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला. शर्थीचे प्रयत्न करत, योग्य साधनांचा वापर करून त्याला कड्याच्या मध्यभागातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. जीव वाचल्याने दीपेश वर्मा याने सुटकेचा निःश्वास सोडला.
फोटो ओळ: दीपेश वर्मा सोबत आपत्ती व्यवस्थापनचे सदस्य

