

Devendra Fadnavis on Pune election
पुणे : राज्यातील मुंबईसह २९ महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झाला. यानंतर राजकीय वर्तुळातील हालचालींना कमालीचा वेग आला आहे. कोठे आघाडी तर कोठे बिघाडी याची चर्चा रुंगू लागली आहे. आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमधील मित्र पक्ष भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकत्र निवडणूक लढवू शकत नाहीत. आम्ही दोघेही राजकारण इतके चांगले समजतो की, जर आम्ही एकत्र लढलो, तर त्याचा फायदा तिसऱ्या पक्षाला होतो. आणि आम्हाला तसे होऊ द्यायचे नाही."
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक आम्ही एकमेकांविरुद्ध लढवू;पण ती मैत्रीपूर्ण लढत असेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्य निवडणूक आयोगाने आज ( दि. १५ डिसेंबर) महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. राज्यातील सर्व २९ महापालिका निवडणुका या १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून या निवडणुकांचे निकाल हे १६ जानेवारी २०२६ रोजी लागणार आहे. राज्यातील २८६९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. १४४२ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. आजपासून २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी आचार संहिता लागू करण्यात आली आहे. राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. २७ नगर पालिकांची मुदत संपली होती. जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन नगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत. २८ बहूसदस्यीय तर बृह्नमुंबई महापालिका ही एक सदस्यीय निवडणूक असणार आहे.