

पुणे : पिसोळी परिसरातील 'ब्रह्माकुमारीज जगदंबा भवन'ला देशातील 'ऊर्जा संरक्षणासाठी सर्वोत्तम निवासी युनिट' म्हणून केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाकडून गौरवण्यात आले आहे. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संचालिका ब्रह्माकुमारी सुनंदादीदी यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनानिमित्त ऊर्जा संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कारांनी सन्मान केला जातो. यंदा “ऊर्जा संरक्षणासाठी सर्वोत्तम निवासी युनिट' या श्रेणीतील पुरस्कारासाठी पुण्यातील ब्रह्माकुमारी जगदंबा भवनची निवड करण्यात आली.
ऊर्जा कार्यक्षमतेसाठी राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण उपाययोजना, शाश्वत जीवनशैलीचा अवलंब तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे जगदंबा भवनची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. या सन्मानामुळे ब्रह्माकुमारीज संस्थेच्या ऊर्जा संवर्धनाबाबतच्या दूरदृष्टीला आणि समाजप्रबोधनात्मक कार्याला नवा गौरव प्राप्त झाला असून, देशभरात ऊर्जाबचतीसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
फोटो ःजगदंबा भवन
ओळ ः पुण्यातील ब्रह्माकुमारीज जगदंबा भवनला 'ऊर्जा संरक्षणासाठी सर्वोत्तम निवासी युनिट' म्हणून केंद्र शासनाच्या वतीने गौरवण्यात आले. त्याबाबतचे सन्मानपत्र आणि पारितोषिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारताना संचालिका ब्रह्माकुमारी सुनंदादीदी.
------------------------------------------------------------------------