पुणे; पुढारी वृत्तसेवा : धायरी, खडकवासला, सिंहगड रस्त्याच्या परिसरात आज (गुरूवार) सकाळ-सकाळी एका विमानाच्या तासभर घिरट्या सुरू होत्या. हे विमान कमी उंचीवरून फिरत असल्याने नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली. या मोठ्या आकाराच्या विमानाच्या तासभर घिरट्या सुरू असल्याने बालचमुंसोबतच मोठ्यांमध्ये भीती आणि कुतुहल निर्माण झाले होते.
अतिशय कमी उंचीवरून हे विमान घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. या परिसरामध्ये लष्कराची विमान फिरत असतात. मात्र हे विमान खूपच कमी उंचीवरून घिरट्या मारत असल्याने चर्चेला उधाण आले होते.
हवाई दलाकडून किंवा लष्कराकडून याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. या विमानाचा आवाज अन्य विमानांपेक्षा मोठा असल्याने नागरिक आपल्या घराच्या गच्चीवर जाऊन हे विमान पाहत होते. त्यामुळे तर्कवितर्क लावण्यात येत होते. विमानाचा आकार आणि आवाज मोठा असल्याने लहान मुलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.