इंधन दरवाढीच्या या संकटाने सामान्य कुटुंबांचे मासिक खर्चाचे बजेट केव्हाच कोसळले आहे आणि आता आणखी इंधन दरवाढीची चाहूल लागल्याने सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. डिझेलचे दर पंचाण्णव-शहाण्णव रुपयांच्या घरात असताना आणि पेट्रोल दराने केव्हाच शंभरी पार केलेली असताना आता लवकरच आणखी तीन रुपयांनी इंधन भडकणार असल्याच्या वृत्ताने सर्वसामान्यांची झोपच उडाली आहे.सामान्य कुटुंबांना या दरवाढीची चांगलीच झळ बसणार आहे; पण त्याबरोबरच वाहतूक, माल वाहतूक यावर परिणाम होईल आणि त्यातून महागाईलाही चालना मिळण्याचीही चिन्हे आहेत. महागाईचा भडका उडाला, तर जनतेच्या हालअपेष्टात भरच पडणार आहे.
अवघ्या वर्षभराच्या काळात पेट्रोल आणि डिझेल दरातील वाढीने उच्चांकच गाठला आहे. मुंबईत सध्या पेट्रोलचा दर आहे 107 रु. 26 पैसे, तर डिझेलचा दर आहे 96 रु. 19 पैसे. हा दर 21 सप्टेंबर 2021 चा आहे. वर्षभरापूर्वी मुंबईतील हे दर किती होते? पेट्रोलचा दर होता 88 रु. 21 पैसे, तर डिझेलचा दर होता 79 रु. 5 पैसे प्रतिलिटर! म्हणजे, वर्षभरात पेट्रोल दरात सुमारे 22 टक्के आणि डिझेल दरातही जवळजवळ तेवढीच टक्के वाढ झाली आहे.
क्रूड दरवाढ
आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे अर्थात क्रूड ऑईलचे दर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. जानेवारीपासून सप्टेंबरअखेर क्रूड तेल दरात वाढ झाली, हे खरेच आहे. जानेवारी 2021 मध्ये क्रूड तेल दर होता 53.60 डॉलर. तो फेब्रुवारीत 60.46 डॉलर आणि मार्चमध्ये 63.83 डॉलर झाला. गेल्या ऑगस्टमध्ये तो होता 68.87 डॉलर आणि चालू सप्टेंबरात तो दर झाला 73.78 डॉलर!
क्रूड आणि पेट्रोल-
डिझेल दरवाढीची पातळी क्रूड तेलाबरोबर पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढणार, हे समीकरण योग्यच म्हटले पाहिजे. तथापि, 2009 मध्ये तेलाचे दर जवळजवळ आजसारखेच म्हणजे 67.70 डॉलर प्रति बॅरल होते तेव्हा पेट्रोलचा दर होता 44 रु. 63 पैसे लिटर, तर डिझेलचा दर होता 32 रु. 87 पैसे. 2012 मध्ये क्रूड तेल दर उच्चांकी पातळीवर म्हणजे 106.28 डॉलर प्रती बॅरल एवढा असताना भारतातील पेट्रोलचा दर 71 रु. 16 पैसे लिटर आणि डिझेलचा दर 40 रु. 91 पैसे लिटर एवढा होता. सात वर्षांपूर्वी क्रूड ऑईल दर 95.85 डॉलर एवढा असताना पेट्रोल दर 68 रु. 51 पैसे आणि डिझेल दर 58 रु. 97 पैसे लिटर असा होता. क्रूड तेल दर कमी झाल्यावर इंधन दर कमी करण्यात आला होता.
…आणि आताची दरवाढ
क्रूड तेलाचे दर 2021 च्या सप्टेंबरात 73.78 डॉलर बॅरल असताना मुंबईत पेट्रोल दर 107 रु. 26 पैसे आणि डिझेल दर 96 रु. 19 पैसे आहे. 2012 मध्ये क्रूड ऑईल दर प्रतिबॅरलला 106.28 डॉलरवर गेले असतानाही पेट्रोल दर 71 रु. 16 पैसे आणि डिझेल दर 40 रु. 91 पैसे होता. आता मात्र प्रतिबॅरलला 73.78 डॉलर क्रूड ऑईलचा दर असताना पेट्रोल दराने शंभरी पार केली आहे, तर डिझेल त्या मागोमागच आहे.
मोठी तफावत
दोन्ही वेळच्या दरांची तुलना केली, तर ही तफावत फार मोठी आहे. क्रूड ऑईलच्या दराच्या तुलनेत इथले इंधन दर नाहीत, असा निष्कर्ष चुकीचा होणार नाही.
दोन-तीन आठवडे दर स्थिरचा दावा केल्यानंतर आता इंधन दरवाढीची टांगती तलवार आहे; पण ती सामान्यांच्या मुळावर येणारी आणि महागाईला चालना देणारी ठरण्याची भीती आहे.
इंधनावरील कर किंमतीपेक्षा अधिक
पेट्रोलचा मूळ दर 41 रु. 78 पैसे आहे. त्याावर केंद्राचा 33 रु. 20 पैसे आणि राज्याचा 18 रु. 62 पैसे + सेस 10 रु. 12 पैसे आहे. म्हणजे सुमारे 62 रु. हा कर होतो. मूळ किंमतीच्या हा कर दीडपट आहे. डिझेलची मूळ किंमत 45 रु. 75 पैसे आहे. केंद्राचा कर 28 रु. 75 पैसे आहे. राज्याचा कर 14 रु. 85 पैसे + सेस 3 रु. आहे. हा कर किंमतीपेक्षा थोडा अधिक होतो.
जी.एस.टी. लागू झाल्यास इंधन स्वस्त
पेट्रोल, डिझेल स्वस्त व्हावे, यासाठी पेट्रोल, डिझेल जी.एस.टी.च्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. जी.एस.टी. च्या कक्षेत पेट्रोल आणि डिझेल यांचा समावेश झाला असता, तर या इंधनाचे दर हे 50 रु. पर्यंत खाली आले असते. तथापि, आपल्या महसुलावर गदा येईल, म्हणून राज्यांनी या प्रस्तावाला विरोध केला आणि महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या विरोधामुळे तो बारगळला.