लंडन ; वृत्तसंस्था : ब्रिटनने आपल्या हवाई प्रवास नियमावलीत अखेर बदल केला आहे. भारतामध्ये उत्पादित 'कोव्हिशिल्ड' या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजुरी दिली आहे. मात्र, दोन्ही डोस घेतलेल्यांना क्वारंटाईन व्हावेच लागणार आहे. त्यामुळे भारतीय प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा लाभ या बदलामुळे होणार नाही.
प्रवास नियमावलीवरून टीकेचे लक्ष्य ठरलेल्या ब्रिटनने ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या लसीला (भारतात कोव्हिशिल्ड) मंजुरी दिली खरी; पण भारतीय नागरिकांना या बदलामुळे दिलासा मिळाला आहे की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.
कारण, नव्या बदलानुसार ब्रिटनने लस घेतलेल्या ज्या देशांच्या नागरिकांना 'क्वारंटाईन'शिवाय (विलग करणे) प्रवासाची परवानगी दिली आहे, त्या देशांच्या यादीत अद्यापही भारताचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे ब्रिटनमध्ये प्रवास करणार्या नागरिकांना अद्यापही तेथे 14 दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक असणार आहे.
नव्या नियमावलीनुसार ब्रिटनने अॅस्ट्राझेनेका (कोव्हिशिल्ड), अॅस्ट्राझेनेका व्हॅक्सजेवरिया, मॉडर्ना, ऑक्सफर्ड/अॅस्ट्राझेनेका, फायझर बायोएन्टेक, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसींना मंजुरी दिली आहे. शिवाय, ज्या लसींना ब्रिटन, युरोपीय संघ, अमेरिकेच्या लसीकरण अभियानांतर्गत परवानगी मिळाली आहे, त्याच लसींना वैध मानण्यात येणार आहे. ब्रिटनच्या नियमावलीला अपवाद म्हणून नमूद देशांच्या यादीत भारत समाविष्ट नसल्याने मंगळवारी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी नाराजी व्यक्त केली होती.