

पुणे: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण (पीएम पोषण) योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये तांदूळ व धान्यादी मालाचा खर्च, शिल्लक साठा आणि दैनंदिन लाभार्थी नोंदी आता पूर्णपणे ऑनलाइन करण्यात येणार आहेत. यामुळे शाळांमध्ये स्वतंत्र नोंदवही ठेवण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सर्व शिक्षणाधिकारी व संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
गोसावी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्यातील सर्व पात्र शाळांनी ३० एप्रिल २०२६ अखेर किंवा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील आहार वितरणाचा शेवटचा दिवस यानुसार उपलब्ध असलेला तांदूळ व धान्यादी मालाचा शिल्लक साठा एमडीएम पोर्टलवरील सुरुवातीची शिल्लक टॅबमध्ये नोंदविणे बंधनकारक केले आहे.
ही नोंद इयत्ता १ ली ते ५ वी आणि इयत्ता ६ वी ते ८ वी अशा स्वतंत्र स्वरूपात किलोग्रॅममध्ये करावी लागणार आहे. शाळांनी शिल्लक साठ्याची माहिती भरल्यानंतर तिची पडताळणी करून जतन करा आणि अंतिम कर करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विद्यार्थ्यांना देण्यात
आलेल्या दैनंदिन आहाराची आणि लाभार्थी विद्यार्थ्यांची
माहिती एमडीएम पोर्टल, मोबाईल ॲप किंवा मेसेजद्वारे नियमितपणे नोंदवावी लागणार आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांनी तांदूळ व इतर धान्याची प्राप्ती, खर्च आणि शिल्लक साठ्याची माहिती एमडीएम पोर्टलवर वेळेत ऑनलाइन नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक महिनाअखेरीस खर्च व शिल्लक साठ्याचा एकत्रित पीडीएफ अहवाल उपलब्ध होणार असून, तो जतन केल्यास स्वतंत्र नोंदवहीची गरज राहणार नाही.
...तर नवीन ॲप डाउनलोड करण्याच्या सूचना
मोबाईल ॲपमध्ये जिल्हानिहाय मेनू दिसत नसल्यास नवीन ॲप स्थापित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गटशिक्षणाधिकारी, पीएम पोषण अधीक्षक आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी ऑनलाइन नोंदींची पडताळणी, तांत्रिक अडचणींचे निराकरण व नियमित देखरेख करावी, असेही निर्देश आहेत. प्रारंभिक शिल्लक, आवक माल, मोबाईल ॲप आणि दैनंदिन उपस्थिती यासाठी चार माहिती पुस्तिका शाळांना उपलब्ध करून दिल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.