

पुणे: महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील नागरिकांनी कोणताही भूखंड किंवा सदनिका खरेदी करण्यापूर्वी संबंधित जागेची बांधकाम परवानगी, मंजूर ले-आऊट, विकास आराखडा आणि अन्य कायदेशीर कागदपत्रांची खातरजमा करून प्लॉट, सदनिका खरेदी करण्याचे आवाहन महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी केले आहे.
महापालिकेत समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्यावर महापालिकेकडून कारवाईचा हातोडा उगारला जात आहे. मात्र, अनेकदा नागरिकांनी अनधिकृत सदनिका घेतल्यानंतर त्यावर कारवाई होण्याचे प्रकार घडत आहे.
त्यामुळे नागरिकांनी कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी संबंधित प्रकल्पास सर्व आवश्यक मंजुरी आहे का, याची खात्री करूनच व्यवहार करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. अनधिकृत प्लॉटिंगमधील भूखंड किंवा बेकायदा बांधकामांतील सदनिका खरेदी केल्यास भविष्यात बांधकाम परवानगी, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते, वीज आणि इतर नागरी सुविधा मिळविताना अडचणी निर्माण होऊ शकतात.
तसेच अशा व्यवहारांमुळे कायदेशीर वाद उद्भवण्याची शक्यताही आहे. नागरिकांनी अनधिकृत प्लॉटिंग किंवा बेकायदा बांधकामांची माहिती तातडीने महापालिकेला द्यावी. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही शहर अभियंता पावसकर यांनी दिला आहे.