

पुणे: राज्यातील सर्व महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये प्रशस्त (पूर्व-मूल्यांकन सर्वसमावेशक तपासणी साधन) ॲप २.० ची प्रभावी अंमलबजावणी करून सप्टेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रवेशित १०० टक्के विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंग (तपासणी) पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसंचालक देविदास कुलाळ यांनी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगर पालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत.
कुलाळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार, भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशस्त ॲप २.० आता यू-डायस-प्लस प्रणालीशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे शाळा, विद्यार्थी, वर्गशिक्षक, मुख्याध्यापक आणि विशेष शिक्षक यांची माहिती एकाच प्रणालीत उपलब्ध होणार असून, विद्यार्थ्यांचे स्वयंचलित समक्रमण, भूमिकेनुसार प्रवेश, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि स्क्रिनिंगच्या कामावर प्रभावी देखरेख करणे शक्य होणार आहे.
हे ॲप नियमित शाळांमध्ये शिकणाऱ्या विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांची सुरुवातीच्या टप्प्यात ओळख पटविण्यासाठी तयार केले आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत अधिसूचित २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाशी संबंधित लक्षणांची प्राथमिक तपासणी या ॲपद्वारे केली जाणार आहे. यामुळे अतिरिक्त शैक्षणिक सहाय्याची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची लवकर ओळख करून त्यांच्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे सुलभ होणार आहे.
परिपत्रकानुसार जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विशेष शिक्षकांसाठी संवेदनशीलता प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. जून-जुलैमध्ये मुख्याध्यापकांचे लॉगिन सक्रिय करण्यात येईल. ऑगस्टमध्ये वर्गशिक्षक व विशेष शिक्षकांची ॲपमध्ये नोंदणी व जोडणी केली जाईल. सप्टेंबरमध्ये वर्गशिक्षकां कडून विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंग पूर्ण करण्यात येणार असून, ऑक्टोबरमध्ये विशेष शिक्षकांकडून दुसऱ्या टप्प्यातील तपासणी केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांचे १०० टक्के स्क्रिनिंग पूर्ण करावे
जिल्हा परिषद आणि महानगरपालिका प्रशासनाने प्रशस्त ॲप २.० मधील संस्थात्मक लॉगिन वेळेत सक्रिय होईल, याची खात्री करावी, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे १०० टक्के स्क्रिनिंग पूर्ण करावे, शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन द्यावे आणि संपूर्ण प्रक्रियेचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देशही परिपत्रकात दिले आहेत.
... अशी आहे प्रमुख कालमर्यादा
जून-ऑगस्ट २०२६ - शिक्षक व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांचे प्राथमिक निरीक्षण
जून-जुलै २०२६ - मुख्याध्यापकांचे लॉगिन सक्रिय करणे
ऑगस्ट २०२६ -वर्गशिक्षक आणि विशेष शिक्षकांची ॲपमध्ये जोडणी
सप्टेंबर २०२६ - वर्ग शिक्षकांकडून १०० टक्के विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंग
ऑक्टोबर २०२६ - विशेष शिक्षकांकडून दुसऱ्या टप्प्यातील तपासणी