पुणे : पुढारी वृत्तसेवा
अमेरिकेच्या एफडीएने कोरोनावरील उपचारांसाठी मंजुरी दिलेल्या 'पॅक्सलोविड'मधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक "निर्मात्रेल्वीर" हे बायोफोर इंडिया फार्मास्युटिकल्सने विकसित केले आहे. यामुळे भारतीय उत्पादकांसाठी परदेशी आयातीवरील आणि प्रामुख्याने चीनवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. लवकरच हे औषध डीसीजीआयकडे मंजुरीसाठी दाखल केले जाणार आहे.
पॅक्सलोविडला यूएस एफडीएद्वारे डिसेंबर 2021 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. प्रौढ आणि बालरोग रुग्णांमध्ये तसेच उच्च धोका असलेल्या रुग्णांवरील, सौम्य ते मध्यम कोरोनाच्या उपचारांसाठी ते उपयुक्त आहे. ही मौखिक गोळी होती जी यूएस एफडीएने मंजूर केली आहे. त्या पूर्वीच्या मंजूर मौखिक उपचारांपेक्षा यामध्ये निर्मात्रेल्वीर आणि रिटोनावीर उपलब्ध आहे.
बायफोरचे सीईओ डॉ. जगदीश बाबू रंगीसेट्टी म्हणाले की, या औषधाचा विकास आणि निर्मिती अत्यंत क्लिष्ट आहे. कोविडसाठी पूर्वीच्या अँटीव्हायरलपेक्षा हे लक्षणीयरीत्या उपयुक्त आहे. जेव्हा उत्पादनाला भारतात मान्यता मिळेल तेव्हा भारतीय उत्पादक भारतातूनच हे घटक मिळविण्यासाठी सक्षम असतील. आयातीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. भागीदारी कंपनी रक्षित ग्रुपचे अध्यक्ष रामेश्वरराव चंदना यांनी सांगितले की, या औषध निर्मितीसाठी अत्यंत तापमान आणि मोठ्या प्रमाणात लिथियम अभिकर्मकांची आवश्यकता असते. आमच्याकडे असलेल्या पायाभूत सुविधांमुळे, आम्ही भारतीय बाजारपेठेच्या गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण करण्यासाठी सक्षम आहोत. ही उत्पादने लवकर बाजारात येतील.