पुणे परिसरात चंदनचोर वाढले; गजाआड मात्र निम्मेच

पुणे परिसरात चंदनचोर वाढले; गजाआड मात्र निम्मेच
Published on
Updated on

अशोक मोराळे

पुणे : शहरात चंदनचोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसून येते आहे. संघटित टोळ्या करून चंदनचोरटे ही चोरी करीत आहेत. मात्र, दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत आरोपी गजांआड होण्याचे प्रमाण पन्नास टक्केच आहे.

बारामती, यवत, सासवड, मोहोळ, सांगोला, खेड, वैराग, मंद्रूप येथील तस्कर प्रामुख्याने शहरातून चंदन चोरी करीत असल्याचे आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. मोहोळे हे तस्करीचे मोठे केंद्र असल्याची माहिती आहे. सिल्वासा व कर्नाटकात येथील चंदनाची तस्करी केली जाते. तस्करीतून होणारी मोठी आर्थिक उलाढाल, संघटीत चालणारे रॅकेट, स्थानिक परिसरातील हितसंबंध, अशा विविध कारणांमुळे दिवसेंदिवस माफिया सुसाट सुटताना दिसत आहेत.

पाच वर्षांत शहरात तब्बल 77 पेक्षा अधिक चंदन चोरीचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. मात्र, दाखल गुन्ह्याच्या तुलनेत आरोपी गजाआड होण्याचे प्रमाण पन्नास टक्केच आहे. त्यामुळे पोलिस चंदन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात कमी पडल्याचे दिसून येत आहेत. चंदन चोरट्यांनी आपला मोर्चा आता शहराकडे वळविला असून, अतिसुरक्षित ठिकाणची सुरक्षा भेदून चंदनाच्या झाडांची चोरी करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे.

सैन्य दलाच्या संस्थेतील आवाराबरोबरच पोलिस दलाच्या ठिकाणाहूनदेखील चंदनचोरी झाली आहे. चोरट्यांनी चंदनाची झाडे चोरी केलेली काही ठिकाणे ही अतिसुरक्षित ठिकाणे समजली जातात. या ठिकाणी चोवीस तास कडक सुरक्षाव्यवस्था तैनात असते.
तरीही चोरट्यांनी ही सुरक्षा भेदल्यामुळे या संस्थांच्या सुरक्षेमधील कमतरता समोर आल्या आहेत. पुण्यात प्रत्येक वर्षी साधारण वीस ते पंचवीस चंदनचोरीचे गुन्हे दाखल होतात. त्यामध्ये किमान 40 ते 50 झाडे चोरीला जात आहेत. चोरटे दिवसभर फिरून चंदनाच्या झाडांची रेकी करतात आणि योग्य वेळ हेरून चोरी करीत आहेत.

…म्हणून चंदनाच्या झाडांची तस्करी

चंदनाच्या झाडांची संख्या कमी असल्याने ते दुर्मिळ म्हणून घोषित केलेले आहे. शहरात झाडांची संख्या मोठी असून, जुन्या संस्थांच्या आवारात चंदनाची झाडे शिल्लक आहे. चंदनाच्या झाडाला अलीकडे खूपच भाव वाढल्यामुळे चंदनाच्या तस्करीत वाढ झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. चंदनांच्या झाडांमध्ये औषधी गुणधर्म आहेत; तसेच त्याचा उपयोग सुगंधी द्रव्ये, सौंदर्य प्रसाधने निर्मितीसाठी वापर होतो. विशेष करून चंदनाच्या तेलाचा 'बॉडी स्प्रे'मध्ये वापर केला जातो.

चंदनचोरीसाठी असे चालते सिंडीकेट…

पोलिस दलातील तपास अधिकारी सांगतात की, बारामती, यवत, सासवड, जेजुरी, खेड, मंद्रूप, मोहोळ, वैराग, सांगोला, जत ही चंदन तस्करी करणारी काही प्रमुख ठिकाणे आहेत. याच परिसरात चोरीचे चंदन विकत घेणारे छोटे-मोठे डिलर कार्यरत आहेत. प्रत्येक डिलकरडे 20-20 पोरे कामाला आहेत. संघटीतपणे या टोळ्यांचे काम चालते. टोळीत काम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे काम ठरलेले असते. दिवसा शहरात फिरून यातील पोरं चंदनाच्या झाडांची रेकी करतात.

खासगी सोसायट्यांबरोबरच शासकीय संस्थांवर डोळा

खासगी सोसायटीबरोबरच शासकीय संस्थातील झाडांची कोणत्या तरी कामाच्या बहाण्याने पाहणी करतात. त्यानंतर रात्रीच्या वेळी तेथे प्रवेश करून संधी मिळताच झाडे चोरी केली जातात. पुढे चोरीचा माल डिलरकडे पोहच केला जातो. तेथून त्याची सिल्वासा व कर्नाटकात तस्करी केला जाती. चोरी झालेले ठिकाण एक तर शासकीय असते किंवा खासगी. खासगी ठिकाणी चोरी झालेले नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येतात. तर शासकीय जागेत चोरी झाली तर जाऊ द्या सरकारी तर आहे असे म्हणून अनेकदा तक्रार देणे टाळले जाते. मात्र, अलीकडच्या काळात तक्रार दाखल होण्याचे प्रमाणदेखील वाढल्याचे दिसते.

बारामतीची टोळी चतुःशृंगी पोलिसांनी केली जेरबंद

चंदनाची झाडे चोरणार्‍या बारामतीमधील टोळीला चतुःश्रृंगी पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात अटक केली होती. त्यांच्याकडून चंदनचोरीचे 16 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते. टोळीतील दोघे दिवसभर शहरात नारळ तोडण्याच्या बहाण्याने फिरून रेकी करीत होते. तयार झालेल्या झाडांबाबत माहिती घेऊन इतर सहकार्‍यांच्या मदतीने गुन्हे करीत असल्याचे आढळून आले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले व त्यांच्या पथकाने हे रॅकेट उघडकीस आणले होते. तर खंडणी विरोधी पथकाने पेरणेफाटा परिसरात पाठला करून एका चंदन तस्कराला पकडले होते. 102 किलो चंदन जप्त करण्यात आले होते.

''चंदन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. दाखल गुन्ह्याच्या तुलनेत पन्नास टक्केपेक्षा अधिक गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावून आरोपींना अटक केली आहे. शहरातील चोरट्यांबरोबरच बाहेरचे चोरटेदेखील शहरातून चंदन तस्करी करीत असल्याचे दिसून आले आहे.''

– श्रीनिवास घाडगे, पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news