पुणे ; पुढारी वृत्तसेवा
पुण्यातील कात्रज येथील प्रभाग क्र ३८ अंतर्गत उत्कर्ष सोसायटीच्या ३० फूट मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनावरून स्थानिक नगरसेवकांमध्ये वाद जुंपला. या दोघांमध्ये थेट रस्त्यावरच वाद विवाद सुरू झाल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी दोघांनी भूमिपूजन करा पण वाद करू नका असे सांगितले.
याविषयी अधिक माहिती अशी की, उत्कर्ष सोसायटी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम व भाजप नगरसेविका मनिषा कदम यांनी डांबरीकरण कामासाठी निधी आपणच मंजूर केला असल्याचे सांगताना दोघांमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
कात्रज तलाव प्रवेशद्वार ते शेलारमळा, गुजरवस्ती, महादेव नगरकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने मोठी वाहतूक असते. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्ता विकासनाची मागणी नागरिकांतून वारंवार होत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने नागरिकांना आकर्षित करण्यासाठी नागरसेवकांमध्ये विकासकामे करण्याच्या स्पर्धा सुरू आहेत. त्यावरून अनेक ठिकाणी श्रेयवाद लढाई पाहायला मिळते. या संदर्भात पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.