पुणे; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाने सुचविलेल्या दुरुस्तीसह महापालिकेच्या ( पुणे महापालिका ) प्रारूप प्रभाग रचनेचा सुधारित आराखडा गुरुवारी महापालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. आता येत्या आठवडा भरातच ही प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांकडून वर्तविण्यात आली.
आगामी महापालिका ( पुणे महापालिका ) निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार केला होता. डिसेंबर महिन्यात हा आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. मात्र, आयोगाने केलेल्या छानणीत प्रभाग रचनेत नैसर्गिक ह्ददीचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या प्रारूप रचनेत आयोगाने तब्बल 28 बदल सुचविले आहेत. त्यानुसार दुरुस्तीसह सुधारित आराखडा तयार करून तो निवडणूक आयोगाकडे सादर करायचा होता. गुरुवारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे आणि निवडणूक विभाग प्रमुख अजित देशमुख यांनी मुंबईत राज्य निवडणूक आयोगाकडे हा दुरुस्ती बदलांसह प्रारूप आराखडा सादर केला. महापालिकेने केलेल्या दुरुस्ती योग्य आहेत की नाही याची छाननी करून आयोगाने हा आराखडा दाखल करून घेतला.
दरम्यान आता पुढच्या टप्यात आयोगाकडून या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करण्याच्या आणि त्याच बरोबर एसी, एसटी व महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. हा कार्यक्रम येत्या आठवडा भरातच होण्याची शक्यता महापालिकेच्या वरिष्ठ सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली. दरम्यान प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यावर पुन्हा हरकती सूचना मागवून अंतिम रचना निश्चित होणार आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने महापालिका ( पुणे महापालिका ) निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार महापालिकेने प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा सादर केला आहे. आता पुढची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून जाहीर होईल. त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.
– रवींद्र बिनवडे, अति.आयुक्त, पुणे मनपा.