पुणे : अंतिम प्रभाग रचना…. आघाडीत राष्ट्रवादीच ‘तुपाशी’!

पुणे : अंतिम प्रभाग रचना…. आघाडीत राष्ट्रवादीच ‘तुपाशी’!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेची अंतिम प्रभागरचना राष्ट्रवादी काँग्रेससाठी अधिक अनुकूल असल्याचे चित्र आहे. मात्र, महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या मोजक्या काही मंडळींची प्रभागरचना वगळली, तर या दोन्ही पक्षांना फारसा वाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना शुक्रवारी रात्री जाहीर झाली. प्रारूप प्रभागरचनेतील 32 प्रभागांच्या रचनेत छोट्या-मोठ्या स्वरूपांचे बदल करून राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. या प्रभाग रचनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सत्तेवर असताना 2017 ला भाजपने ज्याप्रमाणे प्रभागरचना अनुकूल करून सत्तेचा मार्ग सोपा केला होता, तो पॅटर्न आता पुण्यात राष्ट्रवादीने वापरला असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने राष्ट्रवादीसाठी ही प्रभागरचना अधिक अनुकूल अशी झाल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला या तीन मतदारसंघांवर राष्ट्रवादीने लक्ष केंद्रित केले असून, या तीन मतदारसंघांत जवळपास 90 हून अधिक नगरसेवकांची संख्या आहे. त्यामुळे पालिकेतील सत्तेच्या चाव्या म्हणून या तीन मतदारसंघाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याशिवाय शिवाजीनगर, पर्वती या दोन मतदारसंघातही राष्ट्रवादीने यावेळेस प्रभाग रचनेच्या माध्यमातून संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या सर्वच दिग्गजांचे प्रभाग सुरक्षित झाल्याचे दिसून येत असून, ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू आहे.

प्रभागरचनेत शिवसेना 'उपाशी'

राज्यात महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपद असलेल्या शिवसेनेला पुण्यात प्रभागरचनेत फारशी अनुकूल अशी अवस्था असल्याचे चित्र नाही. विद्यमान काही नगरसेवकांचे प्रभाग त्यांच्या सोयीने झाल्याचे दिसत असले तरी, आता पुण्यातील नगरसेवकांची संख्या वाढविण्यासाठी प्रभागरचनेच्या माध्यमातून प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. नगरविकास खाते सेनेकडे असतानाही पुण्याच्या प्रभागरचनेत सेनेच्या नेत्यांनी लक्ष घातलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. हडपसर, वडगाव शेरी, कसबा, पर्वती आणि कोथरूड या मतदारसंघात सेनेचे स्वत:चे प्राबल्य असलेले काही भाग आहेत, त्या प्रभागांवर सेनेला आता अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यामुळे आता पालिका निवडणुकीत आघाडी करूनच संख्याबळ वाढविण्याचे प्रयत्न शिवसेनेला करावे लागणार आहेत.

काँग्रेसमध्ये माननीयांचे प्रभाग अनुकूल

महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसची अवस्था पुण्यात एकसारखीच आहे. पुण्यातील प्रभाग रचनेत काँगेस काही प्रमुख माननीयांचे म्हणजेच माजी पदाधिकार्‍यांचे प्रभाग त्यांना अनुकूल असेच झालेले आहेत. मात्र, सद्या दहावर येऊन ठेपलेले संख्याबळ आगामी पालिका निवडणुकीत वाढेल अशा पद्धतीचे अनुकूल प्रभागरचना काँग्रेससाठीसुद्धा झालेली दिसून येत नाही. त्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानेही लक्ष घातलेले नाही. त्यातच काँग्रेसचा स्वबळाचा नारा कायम आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढल्यास काँग्रेसचा कस लागणार असल्याचे स्पष्ट आहे. प्रामुख्याने पुणे कॅन्टोमेन्ट, शिवाजीनगर आणि कसबा मतदारसंघात काँग्रेसला संधी आहे.

भाजपला 'कांटे की टक्कर'

पुणे : पुणे महापालिकेत गेल्या निवडणुकीत एकहाती मिळविलेली सत्ता पुन्हा राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाला आता जोरदार प्रयत्न करावे लागतील. अंतिम प्रभागरचनेत काही प्रभागांत झालेले बदल राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल ठरणारे आहेत. ते लक्षात घेत भाजपला व्यूहरचना बदलत सक्षम उमेदवारांच्या निवडीवर भर द्यावा लागणार आहे.

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत राज्य सरकारने चार सदस्यांचा एक प्रभाग केला. त्यातच विरोधी पक्षांतील काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वेळी भाजपने 98 जागा जिंकत महापालिकेत सत्ता मिळवली. सुमारे शंभर नगरसेवक, कार्यकत्र्यांचे विस्तृत जाळे, बूथ समित्यांची रचना, यामुळे भाजप मजबूत झाल्याचे चित्र आहे. मात्र, राज्यात आता महाविकास आघाडीची सत्ता आहे. महाआघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास भाजपने गेल्या वेळी जिंकलेल्या काही प्रभागांत ते मोठे आव्हान उभे करतील. विशेषतः हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला या मतदारसंघांत राष्ट्रवादीचा जोर राहण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत या तिन्ही मतदारसंघांत या दोन पक्षांतच लढत झाली होती. नवीन तीन सदस्यांच्या प्रभागरचनेत या तीन मतदारसंघांतील नगरसेवकांची संख्या वाढली आहे. मात्र, तुल्यबळ विरोधकांमुळे या भागात भाजपला त्यांच्या गेल्या वेळच्या जागा टिकविण्यासाठी जोर लावावा लागणार आहे.

कोथरूड, शिवाजीनगर, कसबा पेठ आणि पर्वती मतदारसंघांत भाजपचे वर्चस्व आहे. तेथील काही नवीन प्रभागांची रचना भाजपला अनुकूल झाली आहे. मात्र, या चार मतदारसंघांत भाजपच्या इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यांना उमेदवारी देताना काही नगरसेवकांच्या जागी नव्या चेहर्‍यांना संधी द्यावी लागणार असल्याचे मत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले.

वडगाव शेरी व हडपसरमध्ये वाटते तेवढे सोपे नाही

प्रभागरचनेत झालेल्या बदलाचा पक्षाच्या कामगिरीवर फारसा फरक पडणार नसल्याचे मत पक्षाच्या या नेत्यांनी व्यक्त केले. तरीदेखील गेल्या निवडणुकीत वडगाव शेरी व हडपसरमध्ये मिळविलेल्या जागा राखण्यासाठी भाजपला वाटते तेवढे सोपे नाही. तेथे महाआघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपला काही जागा गमवाव्याही लागतील. भाजपचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांत गेल्या निवडणुकीत भाजपने अधिक जागा जिंकल्या. त्या ठिकाणी या वेळी बदललेल्या राजकीय परिस्थितीत विरोधक काही जागा जिंकण्याची शक्यता आहे. विशेषतः काही नगरसेवक स्वगृही परत गेल्यास, त्या प्रभागातील राजकीय परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.

महापाैर, सभागृह नेत्यांना अनुकूल

गेल्या वेळी मातब्बर विरोधकही पराभूत झाले होते. ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृहनेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांना अनुकूल प्रभागरचना झाली आहे. तसेच सुमारे सात-आठ प्रभाग हे भाजपला अनुकूल झाले आहेत. त्यात कोथरूड, पर्वती, कसबा पेठ येथील प्रभागांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा बदललेली प्रभागरचना ही भाजपला आव्हान देणारी ठरणार आहे. आगामी निवडणुकीत भाजप हाच सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता असली, तरी पुन्हा एकहाती बहुमत मिळविण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.

शहराध्यक्ष म्हणतात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने शहरात चांगले संघटन केले आहे. भाजपचा पाच वर्षांतील निष्क्रिय कारभार राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार आहे. राष्ट्रवादीला निवडणुकीत कोणतीही अडचण वाटत नाही. लवकरच महापौर राष्ट्रवादीचाच असेल.

                                                                                   – प्रशांत जगताप, राष्ट्रवादी.

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्या दबावाखाली प्रभागरचना झाली आहे. ती कशीही झाली तरी पुणेकरांचा विश्वास भाजपवर आहे. मराठा, ओबीसी आरक्षण असे अनेक प्रश्न असल्याने महापालिकेत भाजप पुन्हा एकदा सत्तेत येईल.

– जगदीश मुळीक, भाजप.

प्रत्येक प्रभागात आमच्याकडे सर्व समाजातील इच्छुक आहेत. डिजिटल सभासद नोंदणी, व्यवस्थापन, जाहीरनामा आदी विविध कमिट्या स्थापन केल्या आहेत. गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेत काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या जास्त असेल.

     – रमेश बागवे, काँग्रेस.

महापालिकेत नव्याने समाविष्ट 23 आणि 11 गावांसह उपनगरांमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. इतर पक्षांना पुणेकरांनी संधी दिली आहे. त्यामुळे पुणेकर शिवसेनेवर विश्वास ठेवणार असून, यंदा शिवसेनेचाच महापौर असेल.

– संजय मोरे, शिवसेना.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news