मान्सून अंदमानात दाखल, केरळमध्ये पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण | पुढारी

मान्सून अंदमानात दाखल, केरळमध्ये पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

अंदमानच्या समुद्रात आज सोमवारी मान्सून दाखल झाला. केरळमध्ये तो २७ मे रोजी धडकण्याची शक्यता आहे. असे झाले तर यंदा मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा ५ दिवस अगोदरच दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अंदमानात मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. दरवर्षी सामान्यपणे मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होते. तेथून तो पुढे सरकत देश व्यापतो. पण यंदा मान्सून लवकर दाखल झाला आहे.

मान्सूनने अंदमान निकोबार बेटाचा बहुतांश भाग, बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील ४-५ दिवसांत केरळ, कर्नाटकचा किनारपट्टी आणि दक्षिणेकडील अंतर्गत भाग, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशाच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, आजपासून वायव्य आणि मध्य भारतातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

दक्षिण बाजूकडील बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, संपूर्ण अंदमान समुद्र आणि अंदमान बेटे आणि पूर्वेकडील बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढील २-३ दिवसांत मान्सून पुढे सरकरण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मान्सूनचा प्रवास वेगाने अंदमान बेटांकडे झाला आहे. त्यामुळे दक्षिण भारतात अतिवृष्टी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत दोन दिवस विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडणार असल्याचेही हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्याने दक्षिण भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळात अतिवृष्टी सुरू आहे. आसाम, मेघालय व पश्‍चिम बंगालमध्येही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट सुरूच असून तेथे 45 ते 49 अंश सेल्सिअसवर तापमान गेले आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विदर्भात तापमान 40 ते 44 अंशांवर गेले आहे.

या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना 16 ते 19 मेपर्यंत विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल.

Back to top button