संजय राऊत यांच्याविरूद्ध १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करणार : किरीट सोमय्या | पुढारी

संजय राऊत यांच्याविरूद्ध १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करणार : किरीट सोमय्या

पुढारी ऑनालाईन डेस्क : भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यामध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. आता प्रा. डॉ. मेधा किरीट सोमय्या यांची १०० कोटींच्या शौचालय घोटाळ्याच्या नावाखाली छळ आणि बदनामी केल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरुद्ध मुंबई येथील शिवडी न्यायालयात बुधवारी (दि. १८) १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करणार आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विट करून दिली आहे.

दरम्यान, शौचालय घोटाळ्यानंतर संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीची तक्रार करण्यात आली होती. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्यांनी ही तक्रार केली आहे. राऊतांविरोधात सोमय्या कुटुंबाची मुलुंडमधील नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांनी द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

मीरा भाईंदरमध्ये एकूण १५४ सार्वजनिक शौचालयांपैकी १६ शौचालयाचे बांधकाम करण्याचे कंत्राट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्रे देऊन मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. हा मुद्दा आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत उपस्थित केल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शासनाला सादर केला होता.

हेही वाचलंत का ?

Back to top button